बॉलिवुडमधील कसदार अभिनेता अशी ओळख असलेले परेश रावल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहेत. परेश रावल स्वत: नरेंद्र मोदींवरील चित्रपटाची निर्मिती करत असून गेल्याच वर्षी त्यांनी याबाबत घोषणा केली होती. विवेक ओबेरॉयची भूमिका असलेल्या ‘नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या लाँन्चनंतर रावल यांनी पुन्हा एकदा हा दावा केला. उरी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत रावल बोलत होते. मोदी यांच्या बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत आहे. तर एका दूस-या बायोपिकमध्ये परेश रावल भूमिका साकारत आहेत.
मोदींच्या भूमिकेसाठी कोण परफेक्ट आहे? या प्रश्नावर परेश म्हणाले, ‘विवेक ओबेरॉयविषयी मी बोलणार नाही पण मी या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. भूमिकेसाठी खूप तयारी करावी लागते. कॅरेक्टरमध्ये घुसावे लागते. मोदींसारख्या लूकविषयी ते म्हणाले की, लुक्स तर येतात, पण त्यांच्यासारखे डोळे कुठून आणणार’
‘फारसा अनुभव नसतानाही त्यांनी आधी एक राज्य आणि नंतर एका देशाची धुरा कशी सांभाळली, हे आपल्या चित्रपटातून दाखवणार आहे’ असंही परेश रावल यांनी सांगितलं. ‘ते फक्त पंतप्रधान नाहीत, तर गावोगावी फिरुन समस्यांचा अभ्यास करणारे देशवासी आहेत. यामुळे आम्हाला त्यांच्यावर बायोपिक करावासा वाटला’ असं परेश रावल म्हणाले.