‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी परिणिती चोप्रा तिच्या बहिणीप्रमाणेच चित्रपटसृष्टीत यश प्राप्त करत आहे. रणबीर सिंग, अर्जुन कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत काम करणा-या परिणितीला मोठ्या स्टार्सपेक्षा नव्या चेह-यांसोबत काम करणे अधिक पसंत आहे. त्यामुळे, तिने काही मोठ्या अभिनेत्यांसोबतचे चित्रपटही नाकारले.
परिणिती म्हणाली की, मला अनेक चित्रपटांमध्ये मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याच्या संधी येत होत्या. पण, दुर्देवाने मी त्या नाकारल्या. मला वाटते, मोठे कलाकार असणा-या चित्रपटांमध्ये मला जास्त काही काम करण्यासाठी नसणार. केवळ १० मिनिटांची भूमिका, नेहमीची गाणी आणि नृत्य असणारे चित्रपट करण्याची माझी इच्छा नाही. ज्यामध्ये मी केवळ हिरोईन बनून राहिन. चित्रपटातील भूमिका महत्वाची असणे माझ्यासाठी गरजेचे आहे. माझ्या आधीच्या चित्रपटांमध्ये मला महत्वाच्या भूमिका साकारण्यास मिळाल्यामुळे मी ते चित्रपट केले.
मी योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतल्याने मी खूश आहे. अनेक मसाला आणि अॅक्शन चित्रपटांचे प्रस्ताव माझ्याकडे आले होते. त्यात मला अधिक पैसे कमविण्यास मिळाले असते. मात्र, आता हे चित्रपट प्रदर्शित झाले असून ते न केल्याचा आनंद होत आहे आणि त्यांना नाकारल्याची खंतही माझ्या मनात नाही, असेही ती म्हणाली.
परिणितीची मुख्य भूमिका असलेला ‘शुद्ध देसी रोमान्स’ येत्या शुक्रवारी ६ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. तिच्या यापूर्वीच्या चित्रपटांप्रमाणे शुद्ध देसी रोमान्सदेखील यश प्राप्त करेल अशी आशा आहे.

Story img Loader