अभिनेत्री प्रियांक चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकले. जयपूरमधल्या आलिशान हॉटेलमध्ये राजेशाही थाटात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाला अवघे चार महिने उलटत नाही तोच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगू लागल्या. एका मासिकानं दोघांचा घटस्फोट होणार असल्याचं वृत्त दिल्यानं या चर्चांना अधिकच उधाण आलं. प्रियांका आणि निकनं या वृत्तावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी प्रियांकाची बहिण परिणिती हिनं घटस्फोटाचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
‘मासिकातील लेखात घटस्फोटाबद्दल जे छापून आलं ते खूपच भयंकर होतं. मला याबद्दल जाहिरपणे व्यक्त व्हायचं नाही. माझ्या प्रतिक्रिया मी स्वत:पुरत मर्यादित ठेवत आहे’ असं परिणिती एका मुलाखतीत म्हणाली. ‘त्यांनी(मासिकानं) प्रियांका आणि निकबद्दल जे छापलं आहे ते चुकीचं आहे. त्यांनी तो लेख काढून टाकला आहे यावरून तुम्हाला समजलं असेलच की बातमी खोटी होती’ असं म्हणत तिनं घटस्फोटाचं वृत्त फेटाळून लावलं आहे.
प्रियांका आणि निकच्या नात्याबदद्ल प्रश्नचिन्ह उभं करणारं हे काही पहिलं मासिक नाही. यापूर्वी एका मासिकानं प्रियांकानं केवळ प्रसिद्धीसाठी निकशी बळजबरीनं लग्न केल्याचं म्हटलं होतं. निक लग्नासाठी तयार नव्हता मात्र त्याच्यावर प्रियांकानं लग्नासाठी दबाव टाकला असंही या मासिकात म्हटलं होतं. जगभरातून मासिक आणि त्यात लेख लिहिणाऱ्या लेखिकेवर टीका झाल्यानंतर मासिकानं दोघांची माफी मागत लेख काढून घेतला होता. प्रियांका आणि निक दोघंही आपल्या संसारात आनंदात आहे असं म्हणत परिणीतिनं या दोघांमध्ये सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं आहे.