अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला पठाण हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून नवा वाद रंगला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घाललेल्या भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यामुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. याविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच याप्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी नुकतंच एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्या देशभरात गाजत असलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनवरील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी “जर कुठेही असं काही आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारे दृश्य असेल तर त्याला एडिट करुन पुन्हा प्रदर्शित करायला हवं”, असे म्हटले आहे.
नवनीत राणा काय म्हणाल्या?
“मला असं वाटतंय की ज्या रंगाचा गैरवापर चित्रपटात केला गेला असेल आणि त्यामुळे जर आपल्या देशातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर सर्वप्रथम सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहायला हवा. जर कुठेही असं काही आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारे दृश्य असेल तर त्याला एडिट करुन पुन्हा प्रदर्शित करायला हवं.
एखाद्या चित्रपटाला किंवा इतर कोणत्याही गोष्टीला बॉयकॉट करण्यापेक्षा आक्षेपार्ह किंवा भावना दुखावणारे दृश्य असतील तर सेन्सॉरने ते पाहायला हवं. त्यानंतर त्यात एडिट करुनच ते प्रदर्शित करायला हवं. कारण शेवटी सिनेसृष्टीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यामुळे देशाला आर्थिकरित्या आधार मिळतो.
मी या गोष्टींचा सकारात्मकरित्याच विचार करतेय. पण मला असे वाटतं की जर कोणत्या गोष्टीमुळे आपल्या भावना दुखावल्या जात असतील तर सेन्सॉर बोर्ड आहे, त्यांना त्यांचे काम करायला हवं. आम्हीही फार सकारात्मक पद्धतीनेच याचा विचार करत आहोत की देशभरातील कलाकारांच्या चित्रपटांना बॉयकॉट करु नये. कारण त्यांचा आपल्या देशातील आर्थिक जडणघडणीत फार मोठा वाटा आहे”, असे त्या म्हणाल्या.
आणखी वाचा : “आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर…” शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य
दरम्यान शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ‘बॉयकॉट’ करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.