व्यंकटेश माडगूळकरलिखित ‘पति गेले ग काठेवाडी’ हे नाटक १४ डिसेंबर १९६८ साली प्रथम रंगभूमीवर आलं. सुधा करमरकर दिग्दर्शित, मुंबई मराठी साहित्य संघाची निर्मिती असलेलं हे नाटक जुन्या-जाणत्या रसिकांच्या अद्यापि स्मरणात आहे. आज या गोष्टीस पन्नास वर्ष होत असताना ‘सुबक’चे निर्माते सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरियम’च्या दुसऱ्या पर्वात विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक पुनश्च एकदा मंचित होत आहे. लहानपणी या नाटकाच्या प्रयोगानं भारावलेल्या विजय केंकरे यांनी ते आता दिग्दर्शित केलेलं असल्यानं साहजिकच अधिक अपेक्षा वाढल्यास त्या अप्रस्तुत ठरू नयेत. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्या पूर्ण केल्या आहेत. लोकनाटय़ व संगीत नाटकाची शैली यांच्या सरमिसळीतून व्यंकटेश माडगूळकरांनी हे नाटक रचलं आहे. स्वाभाविकपणेच कथानक पुढे नेणारे सूत्रधार व शाहीर यांच्यातील फ्यूजनमधून नाटक पुढं सरकतं. माडगूळकरांनी त्याकाळी केलेला हा ‘प्रयोग’ नक्कीच अनवट होता. लोकशैली आणि आधुनिक रंगशैली यांना परस्परांसमोर उभं करून दोन्हींतलं माधुर्य अनुभवावयास देण्याचं नाटककार माडगूळकरांचं कसब निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्यातला कथाकार श्रेष्ठ आहेच; परंतु नाटकासारखा तंत्राधिष्ठित कलाप्रकारही ते लीलया हाताळू शकतात, हे ‘पति गेले ग काठेवाडी’मध्ये त्यांनी सिद्ध केलं आहे. आज मात्र अशा सिद्धहस्त लेखकांची वानवा मराठी रंगभूमीला प्रकर्षांनं जाणवते आहे. तर ते असो.
पेशवाईच्या काळात घडलेली ही कथा. अर्थात काल्पनिक. पेशव्यांचे मातब्बर सरदार सर्जेराव शिंदे यांना काठेवाडातील राजा जोरावरसिंग याच्याकडून चौथाई वसूल करण्यासाठी जाण्याचा हुकूम होतो आणि घरी तरुण, सुंदर पत्नीला (जानकीला) एकटीला सोडून जाण्याच्या कल्पनेनं सर्जेराव कासावीस होतो. आपल्या या प्रदीर्घ मोहिमेच्या काळात ती आपल्यापासून दुरावणार तर नाही ना, दुसऱ्या कुणा पुरुषाला वश होणार नाही ना, या चिंतेनं त्याला ग्रासलेलं असतं. जानकी त्याच्या मनीची ही चिंता ओळखते आणि त्याच्या मंदिलात बकुळीच्या ताज्या फुलांचा एक तुरा खोवते आणि सांगते, की जोवर हा तुरा ताजा राहील तोवर तुमच्या पत्नीचं पातिव्रत्य अभंग आहे असं समजा. आणि तरीही चिंता वाटत असेल तर माझं मन चळू नये याकरता मला असं एखादं काम द्या, की ज्यातून मला या गोष्टीसाठी फुरसदच राहणार नाही. आपल्या पुरुषार्थाचा तोरा मिरवणारा सर्जेराव तिला अशी तीन कामं सांगतो, की ज्यातून तिचं पातिव्रत्य सिद्ध करण्याचं अप्रत्यक्ष आव्हानच त्याने दिलेलं असतं. पैकी एक म्हणजे तिनं एकही पैसा खर्च न करता आरसेमहाल बांधावा. दुसरं- तिनं स्वत:ला सवत आणावी. आणि तिसरी गोष्ट- आपल्या परोक्ष आपलं मूल जन्माला घालावं.
खरं तर या तिन्ही गोष्टी अशक्यच कोटीतल्या. परंतु जानकी सर्जेरावानं दिलेलं हे आव्हान हसत हसत स्वीकारते. आपल्या पातिव्रत्याची कसोटी पाहण्यासाठीच सर्जेरावानं या गोष्टी करायला सांगितल्या आहेत, हे ती समजून चुकते.
इकडे काठेवाडचा राजा जोरावरसिंग सर्जेरावच्या मंदिलातील बकुळीच्या ताज्या फुलांच्या तुऱ्याच्या सुगंधानं बेचैन होतो. आणि तो तुरा कधीच कोमेजत नाही याबद्दल तर त्याला असूयाच वाटते. तो सर्जेरावाला त्यामागचं रहस्य विचारतो. तेव्हा सर्जेराव खरं काय ते सांगून टाकतो. सर्जेरावच्या पत्नीच्या निष्ठेचं ते प्रतीक आहे हे कळल्यावर जोरावरसिंग इरेला पेटतो. दिवाणजीला बोलावून तो ‘काय वाट्टेल ते कर, पण सर्जेरावच्या पत्नीला शीलभ्रष्ट कर. काहीही करून सर्जेरावचा बकुळीचा तुरा कोमेजायला हवा,’ असं त्याला फर्मान काढतो.
त्याच्या आदेशानुसार दिवाणजी महाराष्ट्रदेशी येतो आणि कामगिरी फत्ते करूनच माघारी परततो. परंतु तरीही सर्जेरावच्या मंदिलातील तुरा तजेलदारच राहतो. जोरावरसिंग दिवाणजीकडे सर्जेरावच्या पत्नीच्या शीलभ्रष्टतेचा पुरावा मागतो. दिवाणजीनं सर्जेरावच्या पत्नीला नुसतं वश केलेलं नसतं तर तिच्याशी विवाह करून त्याने तिला सोबतच आणलेलं असतं.
मग सर्जेरावच्या मंदिलातील तुरा ताजातवाना कसा? असा प्रश्न जोरावरसिंगला पडतो. अर्थात याचं उत्तर नाटकातच मिळवणं इष्ट.
लोकशैली व आधुनिक रंगशैलीच्या मिश्रणातून लिहिलं गेलेलं हे नाटक दिग्दर्शक विजय केंकरे यांनी तितकंच फक्कड बसवलं आहे. ग्लॅमरविश्वातील अभिजीत खांडकेकर आणि ललित प्रभाकर हे कलावंत घेऊन सादर झालेलं हे नाटक त्यांच्या ‘फेसव्हॅल्यू’मुळे गर्दी खेचत असलं तरी ‘पति गेले ग काठेवाडी’ची जातकुळी खऱ्या अर्थानं जर कुणी आत्मसात केली असेल तर ती जोरावरसिंग झालेल्या निखिल रत्नपारखी यांनी! लोकशैलीत कलावंतांची अभिव्यक्तीतील लवचिकता, वास्तवापल्याडचं वा अतिवास्तववादी विश्व कल्पनेतून साकारणं, त्यासाठी प्रसंगी अद्भुताचाही आधार घेणं, ही जी निकड असते ती यातील इतर कलावंतांच्या ध्यानी आलेली नाही. जानकीच्या भूमिकेतील मृण्मयी गोडबोले यांना दुसऱ्या-तिसऱ्या अंकात ही शैली काहीशी गवसली आहे. मात्र, यातील बहुतेक कलावंतांच्या वास्तव अभिनयशैलीमुळे नाटकातील गंमत थोडी उणावली आहे. लोकशैलीतील लवचिकतेशी, त्यातल्या गमतीजमतींशी ते अवगत असते तर ‘पति गेले ग काठेवाडी’चा रंजनआलेख आणखीन उंचीवर गेला असता. असो. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी प्रयोगाची गती तिन्ही अंकांत चढती राहील याची दक्षता घेतली आहे. (‘तीन अंकी’पण हेही या प्रयोगाचं वैशिष्टय़!) प्रसंग हाताळणीत काळाचे संदर्भ, तत्कालीन रीतीभाती, लोकव्यवहार यांचं भान त्यांनी पुरेपूर राखलं आहे.
नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी या नाटकाची जातकुळी ध्यानी घेत लेव्हल्स, आरशाची महिरपी चौकट, झाड, सिंहासन, आसनसदृश बैठक अशा मोजक्या प्रॉपर्टीचा वापर करून विविध नाटय़स्थळं निर्माण केली आहेत. मंगल केंकरे यांच्या वेशभूषेनं आणि अभय मोहितेंच्या रंगभूषेनंही त्यात पोषक भर घातली आहे. या नाटकाचा मिश्र बाज लक्षात घेऊन अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे ती संगीतकार राहुल रानडे यांनी. नाटय़संगीत, शाहिरी रचना आणि गुजराती लोकगीत-नृत्यातला ताल धरायला लावणारा ठेका यांचा सुंदर वापर करून त्यांनी नाटकाची संगीत बाजू भक्कम केली आहे. शीतल तळपदेंनी प्रकाशयोजनेतून दिवस-रात्रीचे प्रहर मूर्त केले आहेत.
‘पति गेले ग काठेवाडी’ला तरुणाईचा ताजेपणा दिला आहे तो यातील कलावंतांनी. अभिजीत खांडकेकर सर्जेराव म्हणून छान शोभले आहेत. परंतु जोरावरसिंग आणि दिवाणजींबरोबरचे प्रसंग खुलवण्याकरता लोकरंगभूमीचा अभ्यास, लवचिक अभिनयाचा अनुभव गाठीशी असणं आवश्यक असतं तो त्यांच्यापाशी नसल्याने काही प्रसंगांतली गंमत पाहिजे तितकी खुललेली नाही. हीच गोष्ट ललित प्रभाकर यांच्याही बाबतीत म्हणता येईल. ते एक अभ्यासू कलावंत आहेत. मात्र, इथे त्यांनी वास्तव अभिनयशैली स्वीकारल्यानं दिवाणजीची फटफजिती आणि त्यातून येणारं त्याचं चक्रावलेपण ते पुरेशा सच्चेपणानं व्यक्त करू शकलेले नाहीत. हे नाटक सर्वार्थानं कळलं आहे ते जोरावरसिंग झालेल्या निखिल रत्नपारखी यांना! उपजत शरीरयष्टीचा पुरेपूर वापर करत मुद्राभिनय आणि शारीरभाषेतून त्यांनी अर्कचित्रात्मक शैलीत जोरावरसिंग साकारला आहे. लाचार, भयभीत, न्यूनगंडानं ग्रस्त, मधेच आपल्या राजेपदाची जाणीव होऊन फुशारणारा, सर्जेरावबद्दलच्या असूयेनं वेडापिसा होणारा आणि आपण संकटात आल्यावर झुरळ झटकावं तशी जबाबदारी झटकणारा जोरावरसिंग त्यांनी प्रत्ययकारी केला आहे. सर्जेरावच्या मंदिलातील तुऱ्याचा दूरवरून येणारा गंध नाकपुडी फुगवून घेण्याची त्यांची लकब लाजवाब. मृण्मयी गोडबोलेंची पतीनिष्ठ, स्वत्वाचं भान बाळगणारी, पतीला थेटपणे न दुखवता त्याची चूक त्याच्या पदरी घालणारी जानकी लोभसपणे वठवली आहे. प्रारंभीचं दासीपण आणि दिवाणजीशी लग्न झाल्यावर उच्चभ्रू रीतिरिवाज आत्मसात करून त्या थाटात वावरणारी जानकीची दासी मोहना- ईशा केसरकर यांनी समजून उमजून साकारली आहे. धम्मरक्षित रणदिवे, संतोष साळुंके, श्रीकांत वावदे यांनीही आपली कामं चोख केली आहेत. धनंजय म्हसकर यांनी संगीत रंगभूमीवरील सूत्रधार-गायक आणि सिद्धेश जाधव यांनी शाहीर तसंच गुजराती लोकगायक म्हणून छाप पाडली आहे. वेदान्त लेले (तबला), संदेश कदम (ढोलकी), मयूर जाधव (साइड ऱ्हिदम) आणि अमित पाध्ये (हार्मोनियम स्वरमंडळ) यांनीही तोलामोलाची साथ केली आहे.
लोकनाटय़ आणि संगीत नाटकाचा अनोखा संगम असलेलं हे अनवट नाटक एक आगळावेगळा धम्माल नाटय़ानुभव म्हणून एकदा तरी पाहायला हवंच.