गेल्या वर्षभरापासून करोनाने जगभर कहर केला आहे. या वर्षी आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपला देश सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी लावण्यात आलेले लॅाकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. असं असलं तरीही अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला लढा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
चित्रपट संपूर्ण तयार आहे, पण करोनाचं सावट अद्याप गेलं नाही म्हणून रसिकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे. चित्रपटगृहांचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याचे आदेश मिळताच ‘पावनखिंड’च्या प्रदर्शनाची योजना आखण्यात येणार आहे. या चित्रपटातील वैशिष्ट्यं टप्प्याटप्प्यानं रसिकांसमोर येणार आहेत.
आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट
ए.ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरूद्ध आरेकर यांनी केली आहे. ‘पावनखिंड’ हा चित्रपट दिग्पालनं संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील तिसरं पुष्प आहे. या पुष्पमालेतील ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. लवकरच पावनखिंडीतील तो थरार आणि पराक्रम प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.