मराठी ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो लवकरच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू होत असून यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची चर्चा पाहायला मिळाली. मात्र यासंदर्भात त्यांनी स्वत: नुकताच एक खुलासा केला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आपण येणार नसल्याचं उषा नाडकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे.
वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या ‘बिग बॉस’च्या लोकप्रियता अनेकांनाच ठाऊक आहे. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच ‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या १५ एप्रिपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू होत आहे. यामध्ये कोणकोणते मराठी कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होतील याची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ‘बिग बॉस’च्या घरात येणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी साधलेल्या संवादात त्यांनी हे वृत्त नाकारलं. यामागचं नेमकं कारण त्यांनी अद्याप स्पष्ट केलं नाही.
वाचा : एप्रिलमध्ये ‘ऑक्टोबर’ देणार ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चित्रपटांचा नजराणा
उषा नाडकर्णी यांचं एकंदर व्यक्तिमत्त्व पाहता त्यांना मराठी ‘बिग बॉस’च्या घरात पाहणं चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरली असती. दुसरीकडे ‘बिग बॉस’च्या वादग्रस्त घरात अभिनेता ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, गौरी सावंत या कलाकारांनीही येण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नेमके कोणते कलाकार या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होतील, याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे.