प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्याबद्दल एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा आगीत जखमी झाला आहे. पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकरच्या शाळेत अचानक आग लागली आणि या अपघातात तो जखमी जखमी झाला आहे. मार्क शंकर सिंगापूरमध्ये शिक्षण घेत असून सिंगापूरमधील त्याच्या शाळेत अचानक लागलेल्या आगीत त्याला दुखापत झाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, मार्क शंकरच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.
आगीत जखमी झाल्यानंतर मार्क शंकरला सिंगापूरमधीलच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याने त्याचे नियोजित कार्यक्रम पूर्ण करून सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांच्या मुलाच्या या घटनेबद्दल जनसेना पक्षाने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “पवन कल्याण यांनी काल अराकूजवळील कुरीडी गावातील आदिवासींना भेटण्याचे आश्वासन दिले होते. प्रथम ते तिथे जातील आणि त्यांना भेटतील आणि त्यांच्या समस्या जाणून घेतील. विकास योजना सुरू करायच्या आहेत, त्यामुळे तो दौरा संपल्यानंतरच पवन कल्याण सिंगापूरला मुलाला भेटण्यासाठी जातील. विशाखापट्टणवरुन त्यांची सिंगापूरला जाण्याची तयारी सुरू आहे.”
तसंच जनसेना पक्षाने एक्स अकाउंटवरील या पोस्टमध्ये पुढे असंही म्हटले आहे की, “आगीच्या घटनेनंतर मार्क शंकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्याची प्रकृती आता स्थिर आहे.” दरम्यान, पवन कल्याण यांचा मुलगा फक्त आठ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्या अपघाताबद्दलची माहिती समोर येताच अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिंगापूरमधील शाळेमध्ये आग लागली, त्यामध्ये १९ जण जखमी झाले असून त्यापैकी १५ विद्यार्थी आहेत. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून ३० मिनिटांत ही आग विझवली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
अभिनेता पवन कल्याण यांना एकूण चार मुलं आहेत. शंकर हा पवन कल्याण यांच्या चार मुलांपैकी सर्वात धाकटा मुलगा आहे. मार्क शंकरचा जन्म १० ऑक्टोबर २०१७ रोजी झाला होता. आता तो आठ वर्षाचा असून सिंगापूरमध्ये शिकत आहे.