प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या मुलाबद्दल एक बातमी समोर आली होती. पवन कल्याणचा धाकटा मुलगा मार्क शंकरच्या शाळेत अचानक आग लागली आणि या अपघातात तो जखमी जखमी झाला होता. पीटीआयच्या वृत्तानुसार, मार्क शंकरच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. आगीत जखमी झाल्यानंतर मार्क शंकरला सिंगापूरमधीलच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुलाच्या आगीत जखमी होण्याच्या वृत्तानंतर पवन कल्याण तातडीने सिंगापुरसाठी रवाना झाले. यानंतर त्यांनी मुलाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. ८ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पवन कल्याण म्हणाले की, “आमचा धाकटा मुलगा मार्क शंकर, सिंगापूरमधील शाळेतील आगीत जखमी झाला होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो आता हळूहळू बरा होत आहे.” यापुढे पवन कल्याणने पंतप्रधान नरेंद मोदींनीही त्याच्या मुलाच्या प्रकृतीबद्दल विचारणा केल्याचं सांगितलं.
याबद्दल पवन कल्याणने म्हटलं की, “मुलाच्या जखमी होण्याची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना फोन केला होता. यामुळे मला धैर्य मिळाले. तसंच त्यांनी उच्चायुक्तांना सिंगापूरमध्ये मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याचे पवन कल्याणने सांगितलं. त्याचबरोबर पवन कल्याणने त्याच्या मुलासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभारही मानले आहेत.

८ एप्रिल रोजी सिंगापूरच्या रिव्हर व्हॅली रोडवरील एका दुकानात आगीची घटना घडली. जिथे मुलांसह अनेक जण आगीत अडकले. जखमींमध्ये पवन कल्याणचा आठ वर्षांचा मुलगा मार्क शंकर होता. धुराच्या संपर्कात आल्यामुळे त्याचे हातपाय भाजले आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता त्याच्या प्रकृती सुधारणा होत आहे.
दरम्यान, अभिनेता पवन कल्याण यांना एकूण चार मुलं आहेत. शंकर हा पवन कल्याण यांच्या चार मुलांपैकी सर्वात धाकटा मुलगा आहे. मार्क शंकरचा जन्म १० ऑक्टोबर २०१७ रोजी झाला होता. आता तो आठ वर्षाचा असून सिंगापूरमध्ये शिकत आहे.