मागच्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची चर्चा होती. पण काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवर धमाका करत आपण कुठेच कमी नसल्याचं दाखवून दिलं. मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा आहे. एवढंच नाही तर आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटालाही हा चित्रपट टक्कर देणार असं बोललं जात आहे.
दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेला पावनखिंड हा ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर याच चित्रपटाचा बोलबाला आहे. मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पावनखिंडीत दिलेल्या लढ्यावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरनं साकारली आहे. तर अजय पुरकर यांच्या अभिनयानं वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत जीव ओतला आहे.
‘पावनखिंड’ हा चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यानंतर विकेंडला अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटानं तगडी कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाचं कलेक्शन १.१५ कोटी रुपये एवढं होतं. तर शनिवारी हे कलेक्शन २.०५ कोटी एवढं वाढलं. याशिवाय रविवारी या चित्रपटानं ३ कोटी रुपये कमावले. चित्रपटाचं ओपनिंग विकेंड कलेक्शन आतापर्यंत ६ कोटी रुपये एवढं आहे. ‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणार हा पहिलाच चित्रपट आहे.
पहिल्याच दिवशी हा चित्रपट मुंबईतील बी आणि सी सेंटर्समध्ये हाऊसफुल होता. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला १९९० स्क्रिन मिळाल्या. त्यामुळे आता हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘गंगूबाई काठियावाडी’च्या कलेक्शनला तगडी टक्कर देऊ शकतो असं बोललं जात आहे. मराठी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सध्या सगळीकडेच हा चित्रपट चर्चेत आहे.