‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन चित्रपटांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडल्या जात आहेत. यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव’’
प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात पावखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहाताना अक्षरशः अंगावर काटा येतो.
मराठी चित्रपटसृष्टी मागच्या काही काळापासून दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. ज्यात आता ‘पावनखिंड’ चित्रपटाची भर पडली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.