अभिनेत्री पायल रोहतगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करते ज्याची बरीच चर्चा होते. तसेच ती बरेचदा आपल्या पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली आहे. पण आता एका पोस्टमधून पायल रोहतगीने ऑनलाइन खरेदी करत असताना हजारोंचा गंडा घालण्यात आल्याची आणि त्यानंतर तक्रार करूनही सहकार्य न मिळाल्याने सायबर सेलवर नाराजी व्यक्त केली आहे. पायलने सायबर सेलकडून मिळालेल्या कस्टमर केअर नंबरवर वारंवार कॉल करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये अशी तक्रार केली आहे.
‘आजतक’शी बोलताना पायल रोहतगीने सांगितलं, “मी एका प्रसिद्ध ब्रँडचे वर्कआउट आउटफिट्स ऑनलाइन खरेदी केले होते. पण जेव्हा प्रॉडक्ट घरी आले तेव्हा त्याच्या साइझमध्ये काही फरक असल्याने मी ते परत पाठवण्यासाठी अप्लाय केलं. याच दरम्यान मी ते कपडे परत पाठवले. त्या कंपनीच्या माणसाने येऊन ते कपडे परत नेले. पण आता जवळपास १५-२० दिवस उलटून गेल्यावरही मला माझे रिटर्न प्रॉडक्ट्स मिळालेले नाहीत ना कंपनीत कोणताही कॉल आला. अशातच मी कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.”
आणखी वाचा- “आपण एका पॉर्नस्टारला…” बिकिनीच्या वादावरुन पायल रोहतगीने साधला सनी लिओनीवर निशाणा
पायल पुढे म्हणाली, “माझी चूक ही झाली की, मी गुगलवर जाऊन कस्टमर केअर नंबर शोधला. त्यानंतर कस्टमर केअरशी माझं बोलणं आणि लाइव्ह चॅटही झालं. त्यावेळी त्याने मला सांगितलं की मी काही फॉर्म न भरल्यामुळे माझं प्रॉडक्ट अद्याप मला मिळालेलं नाही. त्याने मला फॉर्म भरून द्यायला सांगितला. मी तो फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर एका लिंकवर क्लिक केलं. तर तिथे लिहिलं होतं की कुरियर रजिस्ट्रेशनसाठी १० रुपये देऊन पुढेची प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर मी गुगल पे किंवा पेटीएमवरून पेमेंट करण्याचं ठरवलं. पण त्या कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने मला कार्ड डिटेल्स भरण्यास सांगितलं कारण त्या फॉर्मवर तसंच लिहिलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार मी पेमेंट केला तर मला ओटीपी विचारण्यात आला आणि मी ओटीपी दिल्यानंतर माझ्या आकाउंटमधून १० रुपयांऐवजी तब्बल २० हजार २३८ रुपये काढण्यात आले होते.”
पायल रोहतगीने यानंतर सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ती म्हणाली, “मला हे सांगायचं आहे की गुगल साइट्सवर फ्लॅश होणारे हे कस्टमर केअरचे नंबर आणि लिंक हे खरे नसतात. त्यावरून फसवणूक होते. माझा तर आता गुगलवर विश्वासच राहिलेला नाही. मी त्यासाठी सायबर क्राइमला फोन केला पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा कोणताच नंबर चालू स्थितीत नाही. त्यानंतर मी ऑनलाइन तक्रार दाखल केली. माझ्या सोशल मीडियावरूनही मी हे सर्वांना सांगितलं.”