मुंबईच्या भाऊगर्दीत स्वतःला हरवून बसणाऱ्या लोकांना आयुष्याची रंगत शिकवणारी ‘लालबागची राणी’ सध्या मोठ्या पडद्यावर धूम ठोकत आहे. आयुष्य कसे जगायचे यावर अनेक मतमतांतरे आपल्याला सभोवताली ऐकायला आणि अनुभवयाला मिळतात. आयुष्यावर भाष्य करणाऱ्या अशा या असंख्य गोष्टींमध्ये लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लालबागची राणी’ हा सिनेमा वेगळाच ठरतो. एका स्पेशल चाईल्डच्या नजरेतून आयुष्याचा नवा दृष्टीकोन मांडणारा हा सिनेमा दि. ३ जून रोजी सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट काही दिवसातच लोकांच्या मनात रुंजी घालण्यास यशस्वी झाला आहे. विशेष, म्हणजे या सिनेमाची मौखिक प्रसिद्धी अधिक होत असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर ‘लालबागची राणी’ या चित्रपटाला तसेच दिग्दर्शक लक्षमण उतेकर यांना अनेक लाईक्स मिळत आहे. एवढेच नव्हे तर, उतेकरांना ‘ लालबागची राणी’ या चित्रपटाविषयी सामान्य प्रेक्षकांकडून साकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे. लालबागची राणी हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांचे विश्व बदलले असल्याचे काहीजणांनी सांगितले. स्पेशल चाईल्ड असणाऱ्या संध्याच्या निरागस आणि बाळबोध बोलीतून जगण्याला नवे रंग मिळाले असल्याचे मत अनेक प्रेक्षकांनी मांडले.
‘लालबागची राणी’ या चित्रपटातील एका घटनेत संध्या नंदिनी नावाच्या तरुणीला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करते. चित्रपटातील ही घटना जीवनाला कंटाळून मृत्यूला कवेत घेणाऱ्या अनेक संवेदनशील माणसांना बरेच काही शिकवून जाते. याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे, आयुष्यातील अपयशांमुळे आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या एका तरुणीने हा सिनेमा पाहिल्यानंतर आपले मत बदलले. लक्ष्मण उतेकर ह्यांच्या फेसबुकवर या मुलीने ‘लालबागची राणी’ हा सिनेमा बघितल्या नंतर आपल्यात झालेल्या या बदलाचा मेसेज करताना सांगितलं की, आयुष्यात एकामागोमाग एक घडत असलेल्या कडू घटनांमुळे, अपयशांमुळे तसेच प्रेमभगांमुळे तिच्या मनात वारंवार आत्महत्येचे विचार येत होते. ती मुलगी आय. टी. सेक्टरमध्ये काम करणारी असून मुंबईत एकटी स्थित असल्याने तिच्या मनात असे विचार येणे स्वाभाविकच होते. अशा विचारात उदासीन अवस्थेत एका मॉलमध्ये फिरत असताना वेळ जावा म्हणून त्या मुलीने ‘लालबागची राणी’ पहिला. ‘हा सिनेमा पाहताना माझे अश्रू अनावर झाले, सिनेमा सुरु असताना कोणीतरी खूप दिवसांनी माझ्या दुखण्यावर मायेने फुंकर घातली असल्याचा भास मला झाला, असे तिने सांगितले. ‘ ‘लालबागची राणी’ हा चित्रपट आयुष्य सेलिब्रेट करायला शिकवणारा सिनेमा आहे, आणि या सिनेमामुळे जर एखाद्या नाउमेद व्यक्तीची आयुष्य जगण्याची उमेद पुन्हा जागी झाली असेल तर, ती ‘लालबागची राणी’ या चित्रपटाचे आणि आमच्या संपूर्ण टीमचे मोठे यश आहे, असे उतेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
कसदार अभिनेत्री वीणा जामकरची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सिनेमा एका असाधारण मुलीच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमातील संध्या म्हणजेच लालबागची राणी तिच्या निखळ, पारदर्शीपणाने भेटणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात घर करते. ‘वीणाच्या उत्कृष्ट अभिनयाची सर या चित्रपटात पाहायला मिळत असून, जगाला वेडी वाटणारी ही संध्या खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना विद्वान वाटते.
सुनील मनचंदा यांनी मॅड एटरटेन्मेंट बनर खाली या सिनेमाची निर्मिती केली असून बोनी कपूर हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. यात अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयोग जोशी,जगन्नाथ निवगुने हे कलाकार देखील आहेत.
जगण्याची उमेद जागवणारी ‘लालबागची राणी’
चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणीने आत्महत्या करण्याचा विचार बदलला.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:
आणखी वाचा
First published on: 10-06-2016 at 10:17 IST
TOPICSवीणा जामकर
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People praise lalbaugchi rani movie