८० आणि ९०च्या दशकामध्ये प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणा-या माधुरी दीक्षितचे म्हणणे आहे की, करिअरच्या प्रारंभीच्या दिवसांमध्ये ती बॉलिवूडमध्ये आपले स्थान बनवू शकणार नाही, असे बोलून लोक तिला निरूत्साही करत असत.
काल मुंबईमध्ये झालेल्या समारंभात बोलताना माधुरी म्हणाली, एक महिला असल्यामुळे कठीण प्रसंगातून जाणे  भाग पडते. बॉलिवूडमधील माझ्या सुरुवातीच्या काळात मला चित्रपटात काम करणे शक्य होणार नाही, चित्रपटसृष्टी हे चांगले क्षेत्र नाही आणि मी या क्षेत्रात स्थान बनवू शकणार नाही, असे अनेक टोमणे लोकांनी मला मारले. परंतु, माझ्यात असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर मी काम करत गेले आणि सिद्ध करून दाखवले की मी हे करू शकते.
माधुरी म्हणाली, जेव्हा तुम्ही संकटांचा सामना करता तेव्हा तुम्हाला तुमच्यात असलेल्या शक्तीचा  अंदाज येतो.
१९८४ मध्ये ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या माधुरीला १९८८ मध्ये आलेल्या ‘तेजाब’ चित्रपटामुळे कीर्ती मिळाली. यानंतर तिने ‘राम लखन’, ‘बेटा’, ‘दिल’, ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिल तो पागल है’ सारखे हीट चित्रपट दिले.
१९९९ मध्ये तिने अमेरिकेतील शल्यविशारद श्रीराम नेने यांच्याबरोबर विवाह केला. विवाहपश्चात २००२ साली तिने संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटात काम केले. यानंतर काही काळासाठी चित्रपटांपासून दूर राहून २००७ मध्ये आदित्य चोप्राच्या होम प्रॉडक्शन मध्ये बनलेल्या ‘आजा नचले’ चित्रपटाद्वारे तिने पुनरागमन केले.
आता माधुरी सौमिक सेन याच्या ‘गुलाबी गॅंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर जूही चावला, माही गिल, शिल्पा शुक्ला यांच्यासुद्धा भूमिका आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त ती विशाल भारद्वाज यांचा ‘देढ़ इश्किया’ चित्रपट करत आहे.
‘गुलाबी गॅंग’ चित्रपटाच्या प्रसिद्धीचाच भाग असलेले ‘बिलिव्ह’ नावाचे अभियान अनुभव सिन्हाने सुरू केले आहे, ज्यात भारतीय महिलांच्या विजय गाथांचा सन्मान केला जाणार आहे. या अभियानाची सुरुवात करण्यासाठी अनुभव सिन्हाने माधुरी आणि जूही सह मंगळवारी संध्याकाळी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत जूहीने सांगितले की, अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे आणि ज्यांनी आयुष्याची एक वेगळीच कहाणी रचली आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या क्षमता ताणत नाही, तोपर्यंत तुमच्यात असलेल्या क्षमतेचा तुम्हाला अंदाज येत नाही.

Story img Loader