विश्वास पवार

करोना संसर्गामुळे थांबलेले चित्रीकरण राज्यात पुन्हा सुरू  झाले आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी नियम व अटींवर नुकतीच परवानगी दिल्याने ‘लाईट, साऊंड, अ‍ॅक्शन’चा हा खेळ पुन्हा सुरू झाला आहे.

करोना आणि त्यापाठोपाठ अवतरलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील मनोरंजनाचे विश्वही थांबले होते. चित्रीकरणच बंद झाल्याने अनेक मालिका, चित्रपटांच्या निर्मितीत मोठा अडथळा तयार झाला होता. यामध्येच करोनाने मुंबई, पुण्यात धारण केलेले गंभीर रूप पाहता या क्षेत्रापुढे एक मोठे संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर बहुतांश निर्मात्यांनी मुंबई बाहेर चित्रीकरणासाठी शोधाशोध सुरू केली आहे. यामध्ये  या सर्वाची सर्वाधिक पसंती ही कायमच साताऱ्याला राहिली आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली, पाटण, सातारा शहर, कास पठार, फलटण, औंध हा परिसर चित्रीकरणासाठी निर्माते, दिग्दर्शकांना कायमच खुणावत आलेला आहे. याशिवाय वाई-मेणवली येथील घाट, छोटय़ा छोटय़ा गल्लय़ा, ग्रामीण परिसर, कोयना, धोम, बलकवडी धरण, पाचगणी टेबललँड आदी परिसरही चित्रीकरणासाठी सतत आकर्षित करणारा राहिला आहे.

या परिसरात मराठी चित्रपट आणि मालिकांच्या सोबतच हिंदी, भोजपुरी भाषेतील चित्रपट, मालिका, जाहिरातींचे चित्रीकरणही  सुरू असते.

यामुळे बहुतांश निर्मात्यांनी सध्या साताऱ्यात चित्रीकरणासाठी परवानगी मागितली आहे. यावर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी नियम व अटी घालत या चित्रीकरणासाठी नुकतीच परवानगी दिली आहे. अशी परवानगी मिळताच वाईचे निर्माते लेखक तेजपाल वाघ यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘टोटल हुबलाक’ या मालिकेच्या चित्रीकरणास वाई येथे सुरुवात केली आहे. तसेच श्वेता शिंदे यांच्या ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेच्याही चित्रीकरणास जावली येथे सुरुवात झाली आहे.

सातारा परिसरात चित्रीकरण हा एक मोठा व्यवसाय आहे. यातून अनेकांना रोजगार मिळत आहे. चित्रीकरणासाठी परवानग्या मिळवणे, जागा निवडण्यापासून ते त्याच्या आयोजनांपर्यंत अनेक कामांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळतो. छोटय़ा-मोठय़ा कलाकारांनाही कामे मिळतात. यामुळे निर्मात्यांसोबतच या व्यवसायाशी जोडलेल्या स्थानिक नागरिकांचीही हे चित्रीकरण सुरू करण्याची मागणी होती. जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी परवानगी दिल्याने आता लवकरच ‘बिग बजेट’ चित्रपट निर्मातेही सातारा जिल्ह्य़ाकडे वळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चित्रीकरणासाठी नियम, अटी

चित्रीकरण प्रक्रियेतील प्रत्येकाने मुखपट्टी आणि हातमोजे वापरावेत, सामाजिक अंतर पाळावे, हस्तांदोलन-मिठी मारणे अशा प्रकारची कृत्ये करण्यास मनाई, दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर ठेवावे, ज्येष्ठ नागरिकांना प्रक्रियेत सहभागी होण्यास मनाई; लग्न समारंभ, पूजा, सण, उत्सव, जत्रा, सामूहिक नृत्य आदी समूह दृश्यांना मनाई; केशरचना, मेकअप साठी टाकाऊ वस्तू वापरणे; थर्मल स्कॅनर, हात स्वच्छ करण्याचे रसायन व चित्रीकरण साहित्य स्वच्छ ठेवणे बंधनकारक आदी नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.

करोना प्रादुर्भावानंतर चित्रीकरण सुरू करण्याचा हा भारतातील पहिला निर्णय आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक चित्रपट निर्माते सताऱ्याची वाट धरतील. यातून स्थानिकांनाही मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होईल.

– तेजपाल वाघ, पटकथाकार, निर्माता