एखादा कलाकार आणि वाद यांचा परस्पर संबंध असतो. त्या कलाकाराबाबत एखादा नवा वाद निर्माण झाला नाही तरच प्रेक्षकांनाही त्याचे आश्चर्य वाटते. बॉलीवूडमधील अभिनेता रणवीर सिंग आणि वाद हे जुळून आलेले समीकरण असून, आता एका जाहिरातीमुळे रणवीर सिंग वादग्रस्त ठरला आहे. यापूर्वी रणवीर एका ‘कंडोम’च्या जाहिरातीमुळे तसेच एका शोमुळे वादग्रस्त ठरला होता.  अंतर्वस्त्राच्या एका जाहिरातीत रणवीर शार्क माशाला गुद्दा मारताना दाखविला असून त्यामुळे ही जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ‘एथिकल ट्रिटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ अर्थात ‘पेटा’ या संघटनेने जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.
एका मुलीला ‘पटविण्या’साठी आणि तिला वाचविण्यासाठी रणवीर समुद्रात उडी मारतो. शार्क माशाला तो हातात घट्ट पकडून ठेवतो आणि नंतर माशाला जोरदार गुद्दा मारून हवेत उडवून लावतो. रणवीर सिंगने काम केलेल्या या जाहिरातीत तो एका शार्क माशाबरोबर दाखविण्यात आला असून जाहिरातीत तो या माशाला गुद्दे मारताना दाखविला आहे. ‘पेटा’ने याच कृत्यावर आक्षेप घेतला असून संबंधित जाहिरात कंपनी आणि रणवीर सिंग या दोघांकडेही ‘पेटा’ लवकरच आपला आक्षेप नोंदविणार असल्याचे सांगण्यात येते. एखादी मुलगी ‘पटविण्या’साठी अशा प्रकारे वर्तन करणे आणि माशाला गुद्दा मारणे समर्थनीय ठरत नसल्याचे ‘पेटा’चे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत माणसांकडून मोठय़ा प्रमाणात शार्क माशांची हत्या केली जात असून हे प्रमाण एका वर्षांला काही कोटींमध्ये आहे. समुद्रात पाण्याच्या बाहेर ‘शार्क’ माशाचा जो भाग दिसतो तो मिळविण्यासाठी प्रामुख्याने हे मासे मारले जातात. या भागाचा उपयोग आशिया खंडात ‘सूप’ आणि खाणे म्हणून केला जातो. शार्क माशांची सर्वात जास्त हत्या भारतात होते, असे ‘पेटा’चे म्हणणे आहे.
तर या जाहिरातीत वापरण्यात आलेला शार्क मासा हा खरा नाही. तो रबरी आहे. जाहिरातीमधून कोणत्याही प्राण्याला मारहाण करून त्याचे उदात्तीकरण करण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखाविण्याचा आमचा उद्देश नाही. जाहिरातीसोबत या बाबतचा एक संदेश लवकरच दाखविण्यात येईल, असे जाहिरात तयार करणाऱ्या कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी ही जाहिरात कंपनी, रणवीर आणि ‘पेटा’यांच्यात पुढे काय घडते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader