दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या स्टाईलने, त्याच्या डायलॉग्सने सर्वांनाच वेड लावलं होतं. यानंतर आता मोठ्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पुष्पा सुपरहिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. तर ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम या चित्रपटाबद्दल अपडेट्स देत होती. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच श्रीवल्लीचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे.
अनेक लोक ट्विटरवर फोटो शेअर करत आहेत, ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना म्हणजेच ‘श्रीवल्ली’ मृत्युशय्येवर झोपलेली दिसत आहे. तिच्या शेजारी अनेक मृतदेह ठेवण्यात आले आहेत आणि काही लोक या माणसांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटामध्ये श्रीवल्ली मरणार, असा अंदाज नेटकरी बांधू लागले आहेत. ‘श्रीवल्ली’ मरणार असं वाटल्याने अनेक जण नाराज झाले आहेत. तर हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी ‘पुष्पा २’बद्दल विविध अंदाज बांधायला सुरुवात केली. एकाने लिहिलं, “पुष्पातील खलनायक भवर सिंह शेखावतसोबतच्या मारामारीत पुष्पा त्याची पत्नी गमावेल आणि मग तो तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येईल.”
हेही वाचा : ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने आकारले ‘इतके’ कोटी, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क
या व्हायरल फोटोमध्ये पुष्पा कुठेही दिसत नसल्याने हा फोटो खरोखरच ‘पुष्पा २’ या चित्रपटातील आहे का, हे स्पष्टपणे सांगणं कठीण आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या टीमपैकी कोणीही या व्हायरल फोटोवर कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.