ऑगस्ट महिन्यामध्ये सुरु झालेला बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड काही प्रमाणात ओसरला आहे. या काळात प्रदर्शित झालेले बिगबजेट चित्रपट फ्लॉप झाले होते. याच सुमारास रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. स्पेशल इफेक्ट्स, तगडी स्टारकास्ट असूनही चित्रपटाची कथा आणि संवाद यांमध्ये कमतरता असल्याने चित्रपटावर काहीशी टीकादेखील झाली. असे असले तरी, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘ब्रह्मास्त्र पार्ट १: शिवा’मध्ये अभिनेता शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. याआधीही त्याने काही चित्रपटांमध्ये छोट्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ब्रह्मास्त्र पाहायला जाणाऱ्या प्रत्येकासाठी शाहरुखची ही छोटी, पण महत्त्वाची भूमिका पर्वणी ठरणार आहे. त्याच्या काही चाहत्यांनी फक्त त्याचा कॅमिओ पाहता यावा यासाठी हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखने ‘वानरास्त्र’ या पवित्र अस्त्राशी जोडलेल्या वैज्ञानिकाचे पात्र साकारले आहे. ब्रह्मास्त्रमधल्या त्याच्या पात्रासाठी अयान मुखर्जीने मुद्दामून ‘मोहन भार्गव’ या नावाचा वापर केला आहे.
ब्रह्मास्त्रसाठी शाहरुखला काही अॅक्शन सीन्स करावे लागले. चित्रीकरणादरम्यान त्याच्या बॉडी डबलचाही वापर केला गेला. शाहरुखच्या स्टंट डबलने म्हणजेच स्टंटमॅन हसित सवानी याने त्याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. २०१९ मध्ये चित्रपटाचे अॅक्शन सीन्स चित्रीत करताना त्याने हा फोटो काढला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हसितने फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या फोटोला त्याने “ब्रह्मास्त्र चित्रपटमधील कॅमिओ सीक्वेन्ससाठी शाहरुख खानसारख्या दिग्गज कलाकाराचा स्टंट डबल होण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे.” असे कॅप्शन दिले आहे.
शाहरुखच्या पात्राची वाढती लोकप्रियता पाहता त्या पात्राला मध्यवर्ती ठेवून चित्रपट तयार करायचा विचार करत असल्याचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने म्हटले आहे.