जगदीश माळी आणि मी लहानपणापासूनचे मित्र. एकाच कॉलनीत लहानाचे मोठे झाल्यामुळे आमची दांडगी मैत्री होती. कलावंताच्या चेहऱ्यावरचे भाव अचूक टिपून परेट्र्रेट फोटोग्राफी करणे ही जगदीशची खासियत होती. ‘सिनेब्लिट्झ’ची जगदीशने केलेली अनेक मुखपृष्ठे चर्चेचा विषय झाली होती. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचे बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलावंतांनी जगदीश माळी यांच्याकडे आपले पोर्टफोलिओ केले आहेत. रेखा या तर फक्त त्यांच्याकडेच फोटो काढत असे.
आपल्या छायाचित्रांचे एक पुस्तक काढावे, अशी त्याची इच्छा होती. आजारपणातून उठल्यानंतर या पुस्तकाचे काम आम्ही सुरू करणार होतो. त्याचे हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता मी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे.
जगदीश व्यवसायाने छायाचित्रकार असला तरी तो हरहुन्नरी आणि अष्टपैलू कलाकार होता. त्याला क्रिकेटमध्ये प्रचंड रस होता. आमची एमआयजी क्लबची टीम नावारूपाला आणण्यात त्याचा मोठा वाटा होता. तो आमचा कॅप्टन होता. आणि मी त्याचा सलामीचा फलंदाज होतो. नंतर पुढे मी मॉडेलिंगच्या क्षेत्रात आल्यानंतर आमची भेट झाली ती एका वेगळ्या अर्थाने. मग त्याने माझे असंख्य फोटो काढले.
छायाचित्रकारितेबरोबरत त्याला दिग्दर्शनाचीही आवड होती. ‘ऐका दाजिबा’ हा अल्बम त्याने दिग्दर्शित केला होता. त्यात मी काम केले होते. तो अल्बमही खूप गाजला. कैलाश खेरसोबत त्याने केलेला ‘एक खोज’ हा अल्बमही गाजला. अदनान सामीचा पहिला अल्बमही त्यानेच केला होता. या गोष्टी फारशा कुणाला माहीत नाहीत. पण, त्याने केलेले हे सर्व अल्बम प्रचंड गाजले यावरून त्याचे दिग्दर्शकीय कौशल्य अधोरेखित झाले.
जगदीशला सिनेमाही करायचा होता. गौतम राजाध्यक्ष आणि जगदीश माळी ही दोन नावे कायम कलावंतांच्या पोर्टरेट फोटोग्राफीसाठी लक्षात राहतील.