पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या १४ व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये (पिफ) वेगवेगळ्या देशांचे दोनशेहून अधिक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. खेळांवरील चित्रपट हा यंदाच्या महोत्सवाचा खास विषय आहे.
जगाला दहशतवादाची झळ बसत असताना केवळ खेळ आणि चित्रपट या दोन माध्यमांद्वारेच टोकाचे शत्रुत्व असलेले देशही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे सलोखा वाढविण्याच्या दृष्टीनेच ‘स्पोर्ट्स अँड सिनेमा ब्रिंग द वर्ल्ड टुगेदर’ असा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे. कोथरूड, सातारा रस्ता, आर-डेक्कन येथील सिटी प्राइड, मंगला मल्टीप्लेक्स, आयनॉक्स आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाबरोबरच पिंपरी-चिंचवड येथील दोन ठिकाणी हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी दिली.
महोत्सवामध्ये १५ हून अधिक विभागात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. उद्घाटनपर चित्रपट (ओपनिंग फिल्म), पुरस्कारार्थीचे चित्रपट, मराठी चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धात्मक विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धात्मक विभाग, वेगवेगळ्या देशांतील लक्षणीय चित्रपट (कॅलिडोस्कोप), मनुष्याचे अंतरंग (ह्य़ूमन माइंडस), साहित्य आणि चित्रपट, डीएसके अॅनिमेशन चित्रपट, बदलत्या महाराष्ट्रावरील लघुपट, सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह), भारतीय चित्रपट, मराठी चित्रपट, फिल्म्स डिव्हिजन माहितीपट, जेम्स फ्रॉम नॅशनल फिल्म्स, स्मरण (ट्रिब्यूट) आणि आशिया खंडामधील चित्रपट अशा विभागांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, मराठी चित्रपटांशी निगडित परिसंवाद हे वैशिष्टय़ आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धा विभागातील आणि अॅनिमेशन विभागातील सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी १ हजार अमेरिकन डॉलर्स, दिग्दर्शक, पटकथा, छायांकन यासाठी प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर्स रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे. महोत्सवाचा प्रतिनिधी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी http://www.piffindia.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा