बडय़ा स्टार कलावंतांना घेऊन बिगबजेट मसाला मनोरंजन करण्याचे टाळून दिग्दर्शक शूजित सरकारने मेगास्टार अमिताभ बच्चन यांना घेऊन छोटीशी गोष्ट मिश्कीलपणे मांडण्याचा धमाल यशस्वी प्रयत्न ‘पिकू’ या चित्रपटाद्वारे केला आहे. बच्चन यांच्या कारकीर्दीतील उत्कृष्ट अभिनयाचे उदाहरण म्हणून या आणखी rv14एका चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दिग्दर्शकाच्या मांडणीमध्ये पटकथा लेखिकेचा मोठा वाटा असतोच हे या चित्रपटाने पुन्हा अधोरेखित केले आहे.
सतत कटकट करणारा स्वत:च्या आरोग्याबाबत अतिचिकित्सक असणारे खवचट वृद्ध वडील, त्यांची कन्या पिकू यांची ही गोष्ट मांडताना भारतातील तमाम वृद्धांची मानसिकता, स्वत:कडे आपल्या अपत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्याला वैतागलेली त्यांची मुले याभोवती फिरणारा चित्रपट दाखविला आहे. भाश्कोर बॅनर्जीची ही गोष्ट पाहताना आपल्या अवतीभवती आपण पाहिलेली वृद्ध माणसे, त्यांचा किरकिरा स्वभाव, वरतून कडक-शिस्तप्रिय आणि सतत चिंतातूर वाटणारी ही माणसे मनातून अतिशय साधी, सरळ आणि प्रेमळही असतात याचाही अनुभव आपण अनेकदा घेतलेला असतो. ते सारे छोटय़ा छोटय़ा बारकाव्यांतून वास्तववादी पण कोणताही अभिनिवेश न आणता दिग्दर्शकाने पडद्यावर मांडले आहे. त्यामुळे पिकू आणि तिच्या वडिलांची ही गोष्ट प्रेक्षकांना निश्चितच खिळवून ठेवणारी झाली आहे.
पिकू ही भाश्कोर बॅनर्जी यांची मुलगी आहे. दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत राहणारे दोघांचे कुटुंब आहे. पिकूचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र आहे. ती जाहिरात कंपनीत उच्च पदावर काम करणारी आहे, टीमचे नेतृत्व करणारी स्वावलंबी आणि स्वतंत्र विचारांची आहे. भाश्कोर बॅनर्जी यांना सतत आपल्या बद्धकोष्ठाची काळजी पडलेली असते. पोट साफ झाले तरच मन आनंदी राहते अशी त्यांची धारणा बनली आहे. पिकूला आपण तिच्या आईमागे लहानाचे मोठे केले आणि आपल्याला तिने कधीच सोडून जाता कामा नये, तिने आता वृद्ध वयात आपले पालनपोषण केले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यामुळे तिने लग्न करण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. पिकूलाही लग्न करण्याची अजिबात घाई नाही. पण तिची मावशी मात्र भाश्कोर बॅनर्जी यांच्या मागे पिकूचे लग्न उरकण्याचा लकडा लावतेय. त्याचा पिकू आणि तिच्या वडिलांना दोघांनाही प्रचंड वैताग आला आहे. अशातच कोलकाता येथे असलेल्या वडिलोपार्जित घरी जाण्यासाठी पिकू आणि तिचे वडील दिल्लीहून कारने निघतात.
पिकूमध्येही वडिलांप्रमाणे थोडा तुसडेपणा, विक्षिप्त वृत्ती भिनली आहे. तिच्या कंपनीने ठेवलेल्या टॅक्सी सव्‍‌र्हिस देणाऱ्या मोटारचालकांना पिकूबरोबर जायचे नाही. म्हणून अखेरीस टॅक्सी सव्‍‌र्हिस कंपनीचा मालक राणा चौधरी अखेर पिकू, तिचे वडील यांना दिल्लीहून कोलकाताला कारने घेऊन जातो. दिल्ली ते कोलकाता रस्ते प्रवास, त्यात तिघांचे होत असलेले संभाषण, त्यातल्या छोटय़ा छोटय़ा गमतीजमती, तिघांच्या स्वभावाचे दर्शन, जगण्याविषयीची मते असे सगळे अतिशय संयत, मिश्किलपणे दिग्दर्शकाने टिपले आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वयाला साजेसी भाश्कोर बॅनर्जी ही भूमिका केवळ अफलातून सादर केली आहे. मसाला मनोरंजन करणाऱ्या ढीगभर चित्रपटांतून ‘हिरोईन’ साकारणाऱ्या दीपिका पदुकोणने उभी केलेली पिकू आणि इरफान खानने साकारलेला राणा चौधरी यांनीही उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखवली आहे. आपल्या मूळ घरी, मूळ शहरी गेल्यानंतर वृद्ध व्यक्तींना मनोमन होणारा आनंद, आपल्या शहरातील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची वृत्ती याचे नेमके दर्शन दिग्दर्शकाने घडविले आहे. भूमिकांसाठी केलेली अचूक कलावंत निवड, लेखनातील बारकावे पडद्यावर मांडण्याची दिग्दर्शकाची हातोटी, पूरक संगीत आणि छायालेखन यामुळे चित्रपट उत्कृष्ट बनला आहे.

पिकू
निर्माते – एन. पी. सिंग, रॉनी लाहिरी, स्नेहा राजानी
दिग्दर्शक – शूजित सरकार
पटकथा लेखक – जुही चतुर्वेदी
छायालेखक – कमलजीत नेगी
संकलक – चंद्रशेखर प्रजापती
संगीत – अनुपम रॉय
कलावंत – अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण,
इरफान खान, मौशुमी चटर्जी, रघुवीर यादव,
जिशू सेनगुप्ता, अनिरुद्ध रॉय चौधरी, अक्षय ओबेरॉय व अन्य.

Story img Loader