पिंडदान के ले नाही तर मृतांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. ते तिथेच घुटमळत राहतात. त्यामुळे माणूस मेल्यानंतर पिंडदानाचा विधी केला जातो हा पूर्वापार समज आहे. पिंडदानाच्या याच कल्पनेला मध्यवर्ती ठेवून दिग्दर्शक प्रशांत पाटील यांनी एक वेगळी प्रेमकथा गुंफली आहे. उत्तम निर्मितीमूल्ये आणि नयनरम्य छायाचित्रण यांच्या जोरावर केलेल्या या प्रेमकथेचे दान शेवटच्या काही मिनिटांमध्येच प्रेक्षकांच्या पदरी पडते हा भाग अलाहिदा..
चित्रपट सुरू होतो तेव्हाच कृष्णधवल रंगात एक जुना वाडा, वाडय़ातून रागाने बाहेर पडणारे लोक, कोणाचे तरी आजारपण आणि त्यानंतर नदीकाठी झालेला पिंडदानाचा प्रसंग आपल्याला दिसतो. याचा उलगडाही होत नाही तोवर आपली ओळख लंडनमध्ये एका वाहिनीसाठी काम करत असलेल्या आशुतोष (सिद्धार्थ चांदेकर) आणि रुही (मनवा नाईक) यांच्याशी होते. रुहीचे आशुतोषवर प्रेम आहे, पण आशुतोष मनापासून ते प्रेम स्वीकारायला तयार नाही. पिंडदानाच्या विधीवर एक लघुपट करण्यासाठी म्हणून वाहिनीकडून या दोघांना भारतात पाठवलं जातं. इथे आल्यानंतर ते थेट नंदकेश्वरला पोहोचतात. तिथेच एका जुन्या वाडय़ातील हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्थाही होते. नंदकेश्वरला मनगंगेच्या काठावरती आशुची ओळख अ‍ॅना या ब्रिटिश तरुणीशी होते. अ‍ॅना चांगलं मराठी बोलते. मराठी संस्कृती आणि अध्यात्म यांची अ‍ॅनाला चांगली जाण आहे. एकीकडे रुहीची आशुतोषला प्रेमात बांधून ठेवण्याची धडपड सुरू असते. तर दुसरीकडे आशु अ‍ॅनाच्या प्रेमात ओढला जातो. या तिघांच्या प्रेमकथेचा शेवट हा खरं म्हणजे या चित्रपटाच्या नावाशी संबंधित असलेली खरी कथा आहे.
एक उत्तम कथाकल्पना हातात असूनही दिग्दर्शक म्हणून पडद्यावर ही भव्य प्रेमकथा रंगवण्यात प्रशांत पाटील अपयशी ठरले आहेत. ठोक ळेबाज गोष्टींचा आधार घेत आशु आणि रुहीची कथा रंगवण्याच्या अट्टहासामुळे ना त्यांच्यातली प्रेमकथा रंगली आहे. ना अ‍ॅना आणि आशुमधील प्रेमाचे नाते विश्वासार्ह ठरले आहे. एका रात्रीच्या संबंधांतून रुहीला मातृत्वाची चाहूल लागण्यासारखा अर्थहीन ठोक ळेबाज फॉम्र्युल्याचा वापर करण्यामागचे कारणही न समजण्यासारखे आहे. नंदकेश्वराचे मंदिर, मनगंगा आणि तिचा काठ या सगळ्याचे चित्रण खूपच सुंदर आहे. अभिनयाच्या बाबतीतही सिद्धार्थ, मनवा आणि पॉला मॅग्लेन यांची बाजू वरचढ आहे. मात्र तरीही सुरुवातीपासूनच चित्रपट ठाव घेत नाही. रुहीच्या मनातील दु:ख व्यक्त करण्यासाठी पाश्र्वसंगीतासारखे वापरण्यात आलेल्या गाण्याचाही इतका अतिरेक झाला आहे की ही प्रेमकथा आहे याचाही जणू विसर पडावा. शेवटच्या काही मिनिटांमध्ये चित्रपटाच्या पहिल्या फ्रे मपासून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. तेव्हा कुठे आपण जे पाहिले त्याला काहीएक अर्थ होता, असे चुटपटते का होईना समाधान मानावे लागते.
पिंडदान
दिग्दर्शक – प्रशांत पाटील
कलाकार – सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक, पॉला मॅग्लेन, माधव अभ्यंकर, प्रसाद पंडित, संजय कुलकर्णी आणि फरिदा दादी.

Story img Loader