बॉलिवूडमध्ये सध्या एका मागोमाग एक दुःखद वार्ता ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक ‘केके’चं निधन झालं. ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. अशात आता अभिनेता हृतिक रोशनच्या कुटुंबातून दुःखद बातमी आली आहे. हृतिकच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं नुकतंच निधन झालं आहे. हृतिकची आजी म्हणजेच त्याच्या आईची आई पद्मा राणी यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.
पद्मा राणी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी आणि हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी इन्स्टाग्राम एक भावुक पोस्ट लिहिली आहे. पिंकी यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “दोघेही एकोप्याने आणि शांततेत एकत्र आहेत. माझे आई- वडील. माझं तुम्हा दोघांवर कायम प्रेम आहे.” या फोटोमध्ये पिंकी यांच्या आई- वडिलांचे प्रार्थनासभेतील फोटो आहेत.
पिंकी रोशन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, नीतू कपूर आणि तिची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी यांनी हात जोडलेल्या इमोजी पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय त्यांच्या चाहत्यांनी देखील रोशन कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.
रिपोर्ट्सनुसार पद्मा राणी यांचं निधन वयानुसार आलेल्या आरोग्याविषयी समस्यांमुळे झालं आहे. पद्मा राणी या प्रसिद्ध निर्माता ओम प्रकाश यांची पत्नी होत्या. मागच्या दोन वर्षांपासून पद्मा राणी या हृतिक रोशनच्या कुटुंबीयांसोबतच राहत होत्या. मागच्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या आणि त्यामुळे त्यांना स्वतःहून कोणतीही हालचाल करणं शक्य नव्हतं.