बॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या ‘पीके’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता जास्तच शिगेला पोहोचल्याचे दिसते आहे. अगदी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून ते चित्रपटात धार्मिक गोष्टींवर करण्यात आलेल्या परखड भाष्यामुळे ‘पीके’ कायमच वादाच्या केंद्रस्थानी राहिला. विविध धर्मांतील चुकीच्या प्रथा, बुवाबाजी यासारख्या संवेदनशील विषयांना थेट हात घातल्याने बजरंग दलासारख्या विविध धार्मिक संघटनांनी चित्रपटाविरोधात काहुर माजवण्यास सुरूवात केली. याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी धार्मिक संघटनांकडून घेण्यात आलेले आक्षेप आणि निदर्शनांबाबत मौन बाळगणेच पसंत केले. मात्र, विरोधाची वाढती धग पाहता दिग्दर्शक राजू हिरानी यांनी चित्रपटाच्या बचावार्थ पुढे सरसावत एका निवदेनाद्वारे ‘पीके’ची बाजू मांडली.
काही संघटनांच्या पीकेविरोधातील कृतींमुळे मी अतिशय चिंतित आणि दु:खी आहे. आम्ही सर्व धर्मांचा आणि भावनांचा यथोचित आदर करीत असल्याचे राजकुमार हिरानी यांनी ‘पीके’च्या संपूर्ण टीमच्यावतीने सांगितले. संत कबीर आणि महात्मा गांधींच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आमचा हा चित्रपट बनला आहे. पृथ्वीतलावर राहणारे सगळेजण समान आहेत, येथे कोणताही भेदभाव नाही, हा विचार या चित्रपटातून पुढे येताना दिसतो. मुळात मला व्यक्तिश: भारतीय संस्कृती, विचार आणि धर्मांच्या मुळाशी असणाऱ्या अद्वैत या संकल्पनेबद्दल प्रचंड आदर आहे. मात्र, हिंदू धर्माच्या या तत्त्वांना उचलून धरणाऱ्या या चित्रपटावर हिंदू धर्माचा अपमान केल्याची टीका झाल्याच्या विचारानेच मला अत्यंत दु:ख झाल्याचे हिरानी यांनी म्हटले आहे. आतापर्यंत ज्या लोकांनी चित्रपटावर भरभरून प्रेम केले. त्यांचे मी आभार मानतो. चित्रपटातील खरोखरीच्या धार्मिक भावनेला लोकांनी उचलून धरले असून, फक्त धार्मिकतेच्या दुरूपयोगाबद्दल टीका करण्यात आली आहे. जे लोक चित्रपटाचा विरोध करीत आहेत, त्यांनी सर्वप्रथम संपूर्ण चित्रपट पाहावा आणि प्रत्येक दृश्याचा वेगवेगळा अर्थ लावू नये. कोणाच्याही धार्मिक भावनांना दुखावण्याचा आमचा आजिबात हेतू नव्हता. हिंदू धर्मातील ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर माझा गाढा विश्वास आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यासह सर्व धर्म आपल्याला प्रेम आणि परस्परांविषयी बंधुत्वाची शिकवण देतात. ‘पीके’ या चित्रपटाच्या केंद्रस्थानी हेच सूत्र असल्याचे राजकुमार हिरानी यांनी सांगितले.