मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आता प्लॅनेट मराठी हे नवं ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु झालंय. लवकरच या ओटीटीवर अनेक हटके वेब सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. नुकताच प्लॅनेट मराठीच्या पहिल्या वेब सीरीजच्या शूटिंगचा श्रीगणेशा झाला.
‘हिंग, पुस्तक, तलवार’ असं हटके नाव या वेब सीरिजचं आहे. निपुण धर्माधिकारी हा या वेबसीरीजचा ‘सुपरव्हिजन’ दिग्दर्शक असेल तर त्याच्या दिमतीला मकरंद शिंदे, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे हे देखील दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. आलोक राजवाडे, नील साळेकर, सुशांत घाटगे, केतकी कुलकर्णी, मुग्धा हसमनीस ही कलाकार मंडळी या वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकतील.
नावावरूनच काहीतरी हटके असणाऱ्या या वेबसीरिजची कथा सहा व्यक्तींच्या अवतीभवती फिरणारी आहे. ही धमाल, विनोदी वेबसीरिज प्रेक्षकांना आठ भागात पाहायला मिळणार आहे. “प्रेक्षकांना पहिल्यांदाच जरा वेगळी आणि रंजक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजमधील प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपल्या जवळपास वावरणारी असून एखादं पात्र आपल्यातही कुठेतरी दडल्याचं भासवणारी आहे. मुळात यातील कथा दैनंदिन आयुष्याशी जवळीक साधणाऱ्या असल्याने त्या सर्वच वयोगातील प्रेक्षकांना आवडतील. ” असं निपुणने या वेब सीरिजबद्दल सांगितलंय. विनोदात निपुणचा हातखंडा आहे. त्यामुळे ही सीरिज चांगलीच मनोरंजक असेल असं टीमचं म्हणणं आहे.
प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, “प्रेक्षकांना काहीतरी चौकटीबाहेरचे आणि दर्जेदार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. तेच तेच विषय हाताळण्यापेक्षा काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशानेच आम्ही ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. ओंकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांनी या वेब सीरिजची कथा लिहली अशून ही वेबसीरिज मे २०२१ मध्ये प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.”