‘नऊ कोटी सत्तावन्न लाख’ या नाटकाच्या नावावरून काहीच अर्थबोध होत नाही. नाटक कोणत्या प्रकारचं आहे? कशाबद्दल आहे? काहीच समजत नाही. परंतु प्रत्यक्ष प्रयोग बघताना मात्र आपण हसून हसून बेजार होतो. फार्स म्हटलं की थापेबाजी आली. एक खोटं लपवायला दुसरं खोटं.. ते दडवायला तिसरं खोटं.. अशा थापांची तडतडणारी फटाक्यांची माळच एकापाठोपाठ फुटत जाते आणि प्रेक्षक त्यात वाहवत जातात. संजय मोने लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘नऊ कोटी सत्तावन्न लाख’ हा असाच एक धूमशान इरसाल फार्स.
त्याचं थोडक्यात कथानक असं : दिलीप देवकुळे हा गृहस्थ पुण्याहून मुंबईला येताना बसमध्ये कुणीतरी त्याच्या बॅगेची अदलाबदल करतं. त्याच्या बॅगेत चितळ्यांच्या बाकरवडय़ा असतात. तर तिच्या जागी ठेवलेल्या बॅगेत नऊ कोटी सत्तावन्न लाख रुपयांची देशी-विदेशी चलनातील नोटांची पुडकी असतात. दिलीपच्या हे ध्यानी येताच तो मुंबईत बसमधूनन उतरल्यावर थेट घरी न जाता टॅक्सीने इतस्तत: भटकून नंतरच आपल्या घरी जातो. कारण काय? तर कुणाच्या हे लक्षात आलं असेल तर त्याला आपला ठावठिकाणा समजू नये! दरम्यान, एका हॉटेलात जाऊन त्यानं तिथल्या टॉयलेटमध्ये त्या नोटा पुन:पुन्हा मोजून पाहिलेल्या असतात आणि आपण स्वप्नात तर नाही ना, याबद्दल खातरजमा करून घेतलेली असते.
घाईगडबडीत घरी आल्याक्षणी तो बायकोला- अंजलीला आपल्याला उद्या सकाळीच अमेरिकेला जायचं आहे असं सांगून तयारी करायला सांगतो. तातडीनं फोनवरून विमानाची तिकिटंही बुक करतो. (बहुधा त्यांच्याकडे अमेरिकेचा दहा वर्षांचा व्हिसा आधीच असावा. असो.) अंजली त्याला यातले धोके सांगून सावध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. आपण हे पैसे पोलिसांकडे सुपूर्द करूयात असंही सांगते. परंतु तो काहीएक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसतो.
दुसऱ्या दिवशी सकाळीच दिलीपनं एका ‘ओला’वाल्याला फोन करून बोलावलेलं असतं. ‘ती’ बॅग आणि आवश्यक ते जुजबी कपडे घेऊन ते निघणार एवढय़ात एक इसम बेधडक त्यांच्या घरात शिरतो. दिलीप त्याला हुसकून लावण्याच्या प्रयत्नांत असतानाच तो आपण डिटेक्टिव्ह असल्याचा गौप्यस्फोट करतो. गाडीच्या प्रवासात दिलीपच्या अस्वस्थ हालचाली हेरून त्याच्याकडे बेनामी पैशांची बॅग असल्याचा त्याला संशय आलेला असतो. दिलीप त्याला बॅगेतले काही लाख रुपये देऊन त्याची ब्याद कटवायच्या मागे असतानाच ग्रामीण पोलीस इन्स्पेक्टर ‘दिलीप देवकुळे यांचा पुणे-मुंबई प्रवासात खून झाल्याची’ बातमी घेऊन येतात. दिलीपच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याच्या बायकोला घेऊन जायला ते आलेले असतात. हे छानच झालं असं दिलीपला वाटतं. म्हणजे आपण आता जिवंतच नाही आहोत, तर आपल्यामागे कुणी लागण्याचा प्रश्नच उरणार नाही! परंतु अंजलीने यासाठी आपल्याला साथ द्यायला हवी, हे ओळखून तो इन्स्पेक्टरला ‘अंजली ही आपल्या मृत भावाची बायको असल्याचं’ ठोकून देतो. आणि आपण दिलीपचा मोठा भाऊ दिनेश असल्याचं सांगतो. एव्हाना ‘ओला’वाला ड्रायव्हर तिथं येऊन थडकतो. ‘चला, चला’ म्हणून घाई करू लागतो. त्याला ‘दिलीप’चा अचानक ‘दिनेश’ कसा झाला, हेच डोक्यात शिरत नाही. तीच गोष्ट डिटेक्टिव्हची. पण दिलीप त्याला पैसे वाढवून देण्याचं आमिष दाखवून घोळात घेतो आणि आपल्या या नव्या ‘नाटका’त सामील करून घेतो. तेवढय़ात अंजलीची मैत्रीण राधा आणि तिचा नवरा सतीश त्यांच्याकडे येतात. आणि मग हा घोळात घोळ उत्तरोत्तर वाढतच जातो..
लेखक संजय मोने यांनी या फार्समध्ये घटना-प्रसंगाची गुंतवळ चढत्या रंगतीनं गुंफली आहे. एक थाप पचवण्यासाठी दुसरी, मग ती निस्तरण्यासाठी तिसरी.. चौथी..पाचवी.. अशा मग अगणित थापा. एकाच व्यक्तीच्या माथी निरनिराळी नावं, नाती आणि भूमिका थोपविण्याच्या या कसरतीत प्रत्येक जण आपली खरी ओळखच शेवटी विसरून जातो. त्यातून एवढी अराजकसदृश स्थिती निर्माण होते, की कुणाचाच पायपोस कुणात उरत नाही. ही गुंतवळ जशी संहितेत आहे, तशीच सादरीकरणातही ती तितक्याच प्रभावीरीत्या संक्रमित करण्याचं श्रेय जातं- दिग्दर्शक विजय केंकरे यांना! अलीकडच्या काळात केंकरे यांना ‘फार्ससम्राट’ हा किताब द्यावा, इतक्या संख्येनं आणि यशस्वीतेनं त्यांनी ते सादर केले आहेत. वानगीदाखल ‘सर्किट हाऊस’पासून अनेक नावं सांगता येतील. खरं तर ही एक निर्थक थापांची साखळी असते; जी प्रेक्षकांच्या पचनी पडली नाही तर फार्स सादर करणारे पार तोंडावर आपटू शकतात. प्रेक्षकाला विचार करायला किंचितही उसंत न देता त्याच्यावर एकापाठोपाठ एक थापांची अन् त्यातून उद्भणाऱ्या हास्यस्फोटक प्रसंगांच्या मालिकेचं बम्बार्डिग करत राहायचं, हे खचितच सोपं नाही. परंतु केंकरे यांना सहजगत्या ही गोष्ट साध्य झालेली दिसते. चित्रविचित्र पात्रांचा काला, त्यांचं प्रयोजन आणि विहित कार्य विसरून प्रत्यक्षात ते करत असलेल्या भलत्याच उचापतींची धमाल रोलरकोस्टर राइड यात प्रेक्षकांना घडते. ‘नॉनसेन्सनेस’चा अतिरेक हे फार्सचं भांडवल. ते यात शिगोशीग आहे. समस्त कलाकारांना त्या मोटेत बांधण्याचं काम दिग्दर्शकानं मोठय़ा हिकमतीनं केलं आहे.
प्रदीप मुळ्ये यांनी साकारलेला दिलीप देवकुळेचा आलिशान बंगला प्रसन्न, आल्हाददायी आहे. नितीन कायरकर (संगीत) व शीतल तळपदे (प्रकाशयोजना) यांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. मंगल केंकरे यांनी वेशभूषेतून पात्रांना ‘ओळख’ दिली आहे.
आनंद इंगळे (दिलीप देवकुळे) यांनी आजवरची आपली हातखंडा विनोदी अभिनयाची पठडी सोडून इथे प्रथमच फार्समध्ये काम केलं आहे. सुखद आश्चर्याची बाब म्हणजे यातही त्यांनी धम्माल उडवून दिली आहे. एकापेक्षा एक लोणकढी थापांचे चौकार-षटकार मारून ते स्वत:च बेजार झाले आहेत असं वाटत असतानाच एखादा क्षीण धागा हाती लागला रे लागला, की पुन्हा नव्या दमानं थापांचं जाळं विणण्याची त्यांची यातली करामत लाजवाब! आपलं साधं-सरळपण जोपासण्याच्या धडपडीत सतीशची उडणारी तारांबळ संजय मोने यांनी फारशी तोशीस न करता दाखवली आहे. मंगेश साळवींचा नाटकाच्या वेडानं झपाटलेला ‘ओला’चा ड्रायव्हर आपले हशे चोख वसूल करतो. बडा भाई म्हणूनही ते शोभले आहेत. विवेक गोरेंचा ग्रामीण पोलीस इन्स्पेक्टरही फर्मास. डिटेक्टिव्ह झालेले राहुल कुलकर्णी मधेच एन्ट्री घेत ‘बनती हुई बात’ बिघडवायचं काम यथास्थित करतात. सुलेखा तळवलकरांची अंजली प्राप्त गोंधळात भर घालायचं काम करते. नस्ता मूर्खपणा करून गोंधळात गोंधळाचा कडेलोट करणारी सतीशची बायको राधा- रेणुका बोधनकर यांनी छान वठवली आहे.
चार घटका डोकं बाजूस ठेवून निखळ मनोरंजन हवं असेल तर ‘नऊ कोटी सत्तावन्न लाख’ला पर्याय नाही.