नाटकाबाबत मराठी कलाकार आणि प्रेक्षक आजही चोखंदळ असल्याचे आपल्याला पहायला मिळते. चांगले नाटर रंगभूमीवर येण्याची अनेक जण आजही वाट पाहत असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते. पण चित्रपट आणि मालिका यांच्या व्यापातून नाटकासाठी वेळ देण्यास कलाकारांना काही अडचणी येत असल्याचे चित्र आहे. तेरा दिवस प्रेमाचे या नाटकातून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. नाटककार आनंद म्हसवेकर यांचे २२ वे नवेकोरे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर येत आहे.

म्हसवेकर हे मागील अनेक वर्षे एकांकिका, हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक व निर्माता म्हणून कार्यरत आहेत. म्हसवेकर यांनी आतापर्यंत गंभीर; तसेच विनोदी बाजाची विविध नाटके लिहिली आहेत. मात्र ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे, एक गंभीर विषय विनोदी पद्धतीने या नाटकात मांडला असून मनोरंजन आणि गंभीर प्रवृत्ती याची अनोखी सांगड यामध्ये घालण्यात आली आहे. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सलग सहा दिवस रंगणार आहेत. १६ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर येथे या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले नाट्यगृह (१७ ऑगस्ट), गडकरी रंगायतन (१८ ऑगस्ट), कालिदास नाट्यगृह (१९ ऑगस्ट), प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह (२० ऑगस्ट) आणि २१ ऑगस्ट रोजी पुन्हा शिवाजी मंदिर असे हे सहा दिवस सलग प्रयोग असतील.

‘प्रयोग फॅक्टरी’ निर्मित व ‘जिव्हाळा’ प्रकाशित या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, शिरीष राणे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. अनुराधा सामंत या नाटकाच्या निर्मात्या आहेत. संदेश बेंद्रे यांनी या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे. मयुरेश माडगांवकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. तर विनय आनंद यांची प्रकाशयोजना आहे. कार्यकारी निर्माता म्हणून विनय म्हसवेकर हे काम पाहात आहेत. अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, संजय क्षेमकल्याणी, शर्वरी गायकवाड, मेघना साने, देवेश काळे व संजय देशपांडे हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत.