|| रवींद्र पाथरे
वर्तमान पिढी ही नेहमीच मागील पिढीच्या खांद्यावर उभी असते असं म्हणतात. तेव्हा भूतकालीन पिढीस नाकारताना तिची बलस्थानं आणि त्रुटी या दोन्हीचा अभ्यास आवश्यक असतो. केवळ गतपिढीस नाकारल्याने वर्तमान पिढी मोठी ठरत नाही. आणि ती जर का तसा दावा करीत असेल तर ती उथळ, उच्छृंखल आणि दिशाहीन आहे असं खुशाल समजावं. डॉ. आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रीय तरुणीने दीडशे वर्षांपूर्वी सनातनी, रूढीग्रस्त भारतीय समाज, आर्थिक परिस्थिती, वरकरणी सुधारकी, परंतु वर्तनाने विक्षिप्त असा पती असे अडचणींचे असंख्य डोंगर पार करीत अमेरिकेत जाऊन पहिली भारतीय महिला डॉक्टर बनण्याचा बहुमान मिळवला. परंतु या खडतर प्रवासातले प्रचंड कष्ट, ताणतणाव, भीषण मानसिक-भावनिक-शारीरिक संघर्ष आणि अमेरिकेतील प्रतिकूल हवामान या सगळ्याला तोंड देताना त्यांना अकाली क्षयाची बाधा झाली आणि भारतात परतल्यावर डॉक्टरी पेशा करण्याची प्रत्यक्ष संधी न मिळताच त्यांचं अवघ्या बावीसाव्या वर्षी निधन झालं. त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं खरं, परंतु डॉक्टर होऊनही त्यांना सनातनी वृत्ती आणि रूढीग्रस्ततेच्या दलदलित फसलेल्या भारतीय स्त्रियांना वैद्यकसेवा उपलब्ध करून देण्याचं त्यांचं स्वप्न मात्र अधुरंच राहिलं. अर्थात त्यांच्या पश्चात डॉ. रखमाबाई आदी पुढच्या भारतीय स्त्रियांना डॉक्टर होण्याचा मार्ग त्यांनी प्रशस्त करून दिला. हे त्यांचं काम निश्चितपणे इतिहासाला नोंद घ्यायला लावणारं आहे. आज सर्वच क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या भारतीय महिलांनी- विशेषत: वैद्यकीय पेशा पत्करणाऱ्या स्त्रियांनी डॉ. आनंदीबाईंचं हे ऋण मान्य करायलाच हवं.
डॉ. आनंदीबाईंचं जीवन आणि त्या ज्या काळात जन्मल्या त्या काळातील सामाजिक परिस्थिती यांचं चित्रण करणारं बरंच साहित्य आज उपलब्ध आहे. काशीबाई कानिटकर यांनी लिहिलेलं डॉ. आनंदीबाईंचं चरित्र, ‘आनंदी गोपाळ’ ही श्री. ज. जोशींची कादंबरी, आनंदीबाईंवर काही वर्षांमागे येऊन गेलेली दूरदर्शन मालिका, अंजली कीर्तनेकृत ‘डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व’ हा डॉक्युड्रामा, तसंच अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट अशा तऱ्हेनं निरनिराळ्या माध्यमांतून त्यांच्यावर प्रकाश टाकला गेला आहे.
या पाश्र्वभूमीवर ‘डॉ. आनंदीबाई’ हे मूळ गुजरातीतलं, नंतर हिंदीत रूपांतरित झालेलं आणि आता मराठीत आलेलं नाटक (दीर्घाक) बघण्याची संधी नुकतीच मिळाली. गीता माणेकलिखित, मनोज शाह दिग्दर्शित आणि मानसी जोशी अभिनित हा दीघार्ंक आजच्या काळाशी जोडला गेला आहे. सुखदाश्चर्याची गोष्ट म्हणजे मानसी जोशी ही गुणी कलावती तिन्ही भाषांत डॉ. आनंदीबाईंची एकपात्री भूमिका लीलया साकारतात.
डॉ. आनंदीबाई यांना केन्द्रस्थानी ठेवून आजच्या काळावर हे नाटक शेरेबाजी करतं. आपल्या व्हॉट्सअॅप मेसेजला अपेक्षित लाइक्स न मिळाल्याने आत्महत्या करणारी एक तरुणी मृत्युलोकात जाते आणि तिथे डॉ. आनंदीबाईंशी तिची भेट होते. तिच्या आत्महत्येचं कारण ऐकून आनंदीबाईंना आश्चर्याचा धक्काच बसतो. केवळ इतरांना आपण वा आपलं व्यक्त होणं आवडलं नाही म्हणून थेट आत्महत्या करणाऱ्या या तरुणीला काय म्हणावं, असा प्रश्न त्यांना पडतो. मग त्या विचार करू लागतात. माणसं केवळ आपल्याला.. आपली अभिव्यक्ती आणि कृतीला इतरांकडून दाद मिळावी म्हणून इतकी आसुसावीत, की त्यापायी थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ त्यांच्यावर यावी? हे म्हणजे भयंकरच आहे. मग आपल्यासारखा घनघोर जीवनसंघर्ष वाटय़ाला आला तर ही माणसं काय करतील?
हा विचार करता करता त्या आपल्या भूतकाळात डोकावू लागतात. आपली कहाणी सांगू लागतात. तीही त्रयस्थ नजरेनं. कारण त्या आता मृत झालेल्या आहेत. आपल्या आयुष्याकडे, त्यातल्या बऱ्याच गोष्टींकडे आज त्या सहजगत्या, ना खेद- ना खंत यादृष्टीनं पाहू शकतात. भूतकालीन आठवणींची ही लडी उलगडताना त्या अधूनमधून आजच्या काळावरही भाष्य करतात. काळ बदललाय असं आपण म्हणतो, पण खरंच का तो बदललाय, असा प्रश्नत्यांना पडतो. आणि त्यातून त्या आजच्या सेल्फीमग्न पिढीवर क्ष-किरण टाकतात.
लेखिका गीता माणेक यांनी आजच्या सेल्फीमग्न पिढीवर भाष्य करण्यासाठी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना मृत्युलोकीतून भूतलावर आणलं आहे. डॉ. आनंदीबाईंचा आत्मा (जो अमर असतो असं मानलं जातं!) आपली कहाणी सांगता सांगता मधूनच वर्तमान परिस्थितीवरही टीकाटिप्पणी करतो. त्यामुळे नाटकात आपल्याला डॉ. आनंदीबाई जोशी या वर्तमानकालीन वेशभूषेत दिसतात. असं असलं तरीही डॉ. आनंदीबाईंचा जीवनसंघर्ष प्रेक्षकांना उपरा वाटत नाही. त्यांनी वर्तमानातील परिस्थितीबद्दल केलेली शेरेबाजी अनुचित वाटत नाही. काळाला उल्लंघून आनंदीबाई वर्तमानाशी तादात्म्य पावतात. काळ कितीही पुढे गेला तरी माणसाचं मागासलेपण, सनातनीपण, रूढीग्रस्तता त्याच्या वृत्ती-कृतीतून डोकावतच राहते, हे त्यांचं निरीक्षण आपल्याला पटल्याविना राहत नाही.
लेखिका गीता माणेक यांनी डॉ. आनंदीबाईंना वर्तमानात आणून त्यांच्यापुरत्या काही गोष्टी सोप्या करून घेतल्या आहेत. आनंदीबाईंचं जीवन, त्यातले सूक्ष्म तपशील ंपूर्णपणे समजून घेऊन मग ते नाटकातून प्रकट करण्याची अपरिहार्यता त्यामुळेच त्यांना जाणवली नसावी. अर्थात त्यांना ज्या गोष्टीवर लक्ष केन्द्रित करायचं होतं, ती गोष्ट वेगळीच होती. ती त्यांनी डॉ. आनंदीबाईंवरील या दीर्घाकात साध्य केली आहे. त्यासाठी डॉ. आनंदीबाईंना वर्तमानात आणण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं. असो. छान हसतखेळत हे नाटक पुढे पुढे सरकत राहतं. डॉ. आनंदीबाईंचं तर हे नाटक आहेच; त्याचबरोबर ते वर्तमानावरचंही आहे! किंबहुना, ‘आपण दुसऱ्याला आवडायला हवं, त्यांनी आपल्याला नावाजायला हवं, त्यासाठी वाट्टेल ते करायची माणसाची तयारी असते’ या त्रिकालाबाधित निकडीवरचं हे नाटक आहे. डॉ. आनंदीबाईंच्या काळात त्यांनी जग काय म्हणेल वा म्हणतंय, याचा जराही विचार न करता आपलं इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी केलेलं जीवाचं रान त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. खरं तर ते सगळ्याच काळांत सर्वाच्याच बाबतीत महत्त्वपूर्ण असतं, याकडे हे नाटक निर्देश करतं. नाटकात दोष काढायचाच झाला तर एकच काढता येईल. तो म्हणजे- हे नाटक एकाच वेळी तीन- तीन भाषांमध्ये होत असल्याने मराठी प्रयोगात त्याच्या मूळ भाषेचा (गुजराती) प्रभाव जाणवतो. (आलटून पालटून वेगवेगळ्या भाषांत नाटकाचे प्रयोग होत असल्याने असं झालं असावं.) असो.
दिग्दर्शक मनोज शाह यांनी नाटकाचा प्रवाही बाज कायम राहील याची पक्की खबरदारी घेतली आहे. नेपथ्यादीचं फारसं अवडंबर न माजवता काटेकोरपणे आशयावरच त्यांनी भर दिला आहे. कालनिदर्शक म्हणून जुन्या नऊवारी साडय़ांचा प्रतीकात्मक वापर नेपथ्यात केला गेला आहे. आशयपूरक असं मोजकंच पाश्र्वसंगीत (कन्हैया) आणि प्रकाशयोजना (शेखर फडके) योजली आहे.
मानसी जोशी या विलक्षण गुणी कलावतीने हे एकपात्री नाटक अक्षरश: एकहाती लीलया पेललं आहे. मृत्युलोकातील आनंदीबाई ते आपली कहाणी सांगताना बालपण ते निधनापर्यंतची वाटचाल खेळीमेळीत कथन करणारी डॉ. आनंदीबाई.. हा अनेक वाकणावळणांचा प्रवास त्यांनी सूक्ष्म तपशिलांनिशी घडविला आहे. मूळ संहितेतच आनंदीबाई हसतखेळत आपली कहाणी सांगत असल्याने, अधूनमधून वर्तमानावरही भाष्य करत असल्याने हा प्रयोग उत्तरोत्तर रंगतदार होत जातो. मानसी जोशी यांनी परकायाप्रवेशाचा हा मामला मोठय़ा ताकदीने प्रत्ययकारीपणे पेश केला आहे. ‘सं. देवबाभळी’तील त्यांची विठ्ठलाच्या पत्नीची- रुक्मिणीची भूमिका आणि आताची ही डॉ. आनंदीबाईंची भूमिका यांच्यातलं महदंतर लक्षात घेता त्यांच्या चतुरस्रतेचा निश्चितच प्रत्यय येतो. नाटक या कलेकडे गांभीर्यानं पाहणाऱ्यांनी हा आगळा प्रयोग नक्की अनुभवायला हवा.