मिस्टर बीन म्हटलं की लगेचच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि औत्सुक्याचे भाव उमटतील. एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि निर्माता रोवन एटकिन्सन यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा मिस्टर बीन या टोपण नावानेच ओळखलं जातं. कारण ही त्यांची सर्वाधिक गाजलेली व्यक्तीरेखा आहे. मात्र हीच व्यक्तीरेखा आता ते कधीच साकारणार नाहीत. यामागचं कारण खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं.
ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेत असताना त्यांनी मिस्टर बीन ही व्यक्तीरेखा तयार केली आणि १९९० मध्ये टेलिव्हिजनवर या व्यक्तीरेखेचं पदार्पण झालं. ६५ वर्षीय रोवन सध्या मिस्टर बीनच्या अॅनिमेटेड चित्रपटासाठी काम करत असून आता ती व्यक्तीरेखा साकारण्यात मजा येत नसल्याचं वक्तव्य केलं.
“मिस्टर बीन साकारण्यात आता मला मजा येत नाही. ती व्यक्तीरेखा साकारण्याची जबाबदारी मला आनंद किंवा समाधान देत नाही. मला ती व्यक्तीरेखा तणावपूर्ण आणि थकवणारी वाटते. आता त्या व्यक्तीरेखेला पूर्णविराम देण्याचा मी विचार करत आहे”, असं ते ‘रेडिओ टाइम्स’शी बोलताना म्हणाले.
‘मीस्टर बीन’ पलिकडले रोवन एटकिंसन
‘मीस्टर बीन’ ही रोवन यांची सर्वाधिक गाजलेली व्यक्तिरखा आहे. मात्र त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अशा अनेक विनोदी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. रोवन यांनी अभिनय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ आणि ‘ब्लॅकॅडर’ या सिरिजमध्ये काम केले होते. ‘ब्लॅकॅडर’सारख्या विनोदी सिरिजमध्ये त्यांनी मग्रूर ब्रिटिश उमरावाच्या भूमिकेने धम्माल उडवली होती. अॅटकिंसन यांनी फक्त अभिनय क्षेत्रातच नाही तर, रेडिओ विश्वातही एक वेगळीच छाप सोडली होती. १९७८ मध्ये ‘बीबीसी रेडिओ ३’ या वाहिनीवर त्यांचा ‘द एटकिन्सन पिपल’ ही विनोदी कार्यक्रमाची मालिका विशेष गाजली होती. एटकिन्सन आणि रिचर्ड कर्टिस यांनी या मालिकेचे लेखन केले होते.
लहानांपासून ते अगदी मोठ्यांच्या चेहऱ्यावरही आपल्या अतरंगी खुरापतींनी हसू उमटविणारे रोवन एटकिन्सन आजही त्यांनी साकारलेल्या ‘मिस्टर बीन’साठी अधिक ओळखले जातात. पडद्यावर विनोदाला नवी परिभाषा देणारे रोवन हे त्यांच्या आयुष्यातही तितकेच विनोदी आणि मनमिळाऊ आहेत.