माणसाचं मन प्रचंड चंचल असतं. आता या ठिकाणी असेल, तर दुसऱ्याच क्षणी भलत्याच विषयाकडे गेलेलं असेल. त्याला कितीही ठिकाणावर आणायचं म्हटलं तरी ते मूळ विषयाकडे येतंच असं नाही. जगातल्या सगळ्या घटना, अनुभव आणि सुख-दु:ख यांचं मूळ असतं ते मनातच. माणसाचं जगणं हे मनाभोवतीच घुटमळत असतं. किंबहुना माणसाच्या आयुष्यात अनुभवास येणाऱ्या घटना-प्रसंग, त्यातले चढउतार, संवेदना या खरं तर बाह्य जगापेक्षा मनाच्या मंचावर घडणाऱ्याच जास्तकरून असतात. जागृतावस्थेत माणूस सतत विचार करत असतो. एकाच वेळी त्याच्या मनात स्वत:बद्दल, इतरांबद्दल, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरांबद्दल वेगवेगळे विचार सतत येत-जात असतात. या सगळ्या विचारांचं चलनवलन त्याच्या मानसिक तसंच शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतं. त्याचे राग-लोभ, हर्ष, विषाद, उद्विग्नता, चीड, दु:ख अशा सगळ्या भावभावनांचा गुंता त्याच्या मनाला वेढून असतो. त्या-त्या भावनांनुसार त्याचं वागणं, बोलणं, कृती करणं ठरत असतं. त्या भावनांचं नियोजन तो किती व कशा प्रकारे करू शकतो यावर त्याचं व्यक्तिमत्त्व घडत वा बिघडत असतं. एकच माणूस एकाच प्रकारच्या घटनेला वेगवेगळ्या वेळी आणि संदर्भात भिन्न प्रकारे रिअॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ‘समजलेला’ माणूस अकस्मात आपल्याला अनोळखी वाटू शकतो.

नाटककार चं. प्र. देशपांडे यांची आजवरची नाटकं ही एखादा परिचित वा अपरिचित विषय घेऊन त्याचं खोलात उत्खनन करणारी अशीच असतात असं एव्हाना त्यांच्या अभ्यासकांच्या लक्षात आलेलं आहे. अलीकडेच मंचित झालेलं ‘मन’ हे त्यांचं नाटक याच पठडीतलं आहे. अभिजीत झुंजारराव यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. माणसाच्या मनाच्या खेळावरची अनेक नाटकं यापूर्वीही रंगमंचावर येऊन गेलेली आहेत. पण त्यात फक्त मन केंद्रवर्ती नव्हतं. इथं मात्र चं. प्र. देशपांडे यांनी ‘मन’ या विषयाचेच अनेकानेक पैलू नीलकंठ या मध्यमवयीन माणसाच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडले आहेत. हा नीलकंठ तुमच्या-आमच्यासारखाच सर्वसामान्य माणूस आहे. त्याची सुख-दु:खंही सीमित आहेत. त्याच्या मनात येरझारा घालणारे विचार, विकार हे सर्वसामान्यांसारखेच आहेत. त्यावरच्या त्याच्या प्रतिक्रियाही कुणाही सर्वसामान्य माणसासारख्याच आहेत. मुलगी, बायको आणि तो असं तिघांचंच त्याचं कुटुंब आहे. घर, नोकरी, तिथलं राजकारण अशा चक्रातलं त्याचं गोल गोल फिरणं आहे. कधीकाळी तो कुणाच्या तरी प्रेमात पडलेला होता. त्यानं आपल्या या प्रेयसीची एका मित्राशी ओळख करून दिलेली असते. पण नंतर ती त्या मित्राच्याच प्रेमात पडते आणि नीलकंठ हवालदिल होतो. मित्रावर सूड उगवण्याचं ठरवतो. पण प्रत्यक्षात मात्र मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे त्याच्या हातून काहीच घडत नाही. याची तीव्र बोच मात्र सतत त्याचा पाठलाग करत राहते. अर्थात कालौघात ती हळूहळू कमी कमी होत जाते. तो दुसऱ्या व्यवधानांत गुंतत जातो.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

हेही वाचा : पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात

ऑफिसमधील दोन युनियनमधील संघर्षातही तो असाच अकारण ओढला जातो. युनियनचे पदाधिकारी कधीकाळी नीलकंठच्या हातून चुकून घडलेल्या एका चुकीचं भांडवल करून त्याला आपल्या गोटात खेचायचा प्रयत्न करतात. नाहीतर त्याने हा ‘घोटाळा’ केल्याचे उघडकीस आणून त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्याची धमकी त्याला देतात. यातून बाहेर कसं पडायचं त्याला समजत नाही. त्यामुळे तो मनोमन अस्वस्थ होतो.

अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींनी त्याचं मन वेळोवेळी संत्रस्त होतं. तो त्या-त्या वेळी सुचेल ते मार्ग, तोडगे त्यावर काढतो खरा; पण त्यात त्याची बरीच ससेहोलपट होते.

कधी कधी क्षुद्र, क्षुल्लक गोष्टी त्याच्या मनाचा ताबा घेतात आणि त्याला हेलपटवून टाकतात. त्याचं सामान्यपण त्यांतून ठळक होतं. तो ते स्वीकारतोही. पण त्याच्या मनाला जाळणाऱ्या वेदना काही त्यातून कमी होत नाहीत. त्याची घुसमट, कोंडी होतच राहते. या असह्य ताणांतून कधीतरी आपल्याला हृदयविकाराचा झटका येईल आणि सगळंच संपेल असंही त्याला वाटतं. पण मग आपल्या पश्चात आपल्या बायको-मुलीचं काय होईल याचीही चिंता त्याला पोखरत राहते.

त्याचे असे हे मनाचे खेळ अखंडितपणे सुरूच राहतात. अखेर तो सेवानिवृत्त होतो. आणि एकदम त्याला हायसं वाटतं. आजवर आपल्या भवितव्यासंबंधी वाटणाऱ्या सगळ्या यातना, भय यापासून त्याची अकस्मात सुटका होते. आपण उगीचच त्या-त्या वेळी तणावग्रस्त झालो, खरं तर काहीच वाईटसाईट घडणार नव्हतं, घडलंही नाही हे त्याला जाणवतं. त्याला एकदम मोकळं मोकळं वाटतं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”

चं. प्र. देशपांडे यांनी मानवी मनाचा काढलेला हा क्ष-किरणीय रिपोर्ताज माणसाच्या जगण्यावर झगझगीत प्रकाशझोत टाकतो. माणसाची सुख-दु:खं ही तात्कालिक असतात, जीवनाचं रहाटगाडगं अखंड फिरत असतं, त्यात चढउतार होत राहतात, मानवी मन त्यात गुंतून पडतं आणि फरफटत जातं… हा सगळा गुंता बाहेरून तटस्थपणे पाहणाऱ्याला कळून येतो. पण तो प्रत्यक्ष भोगणाऱ्या त्या माणसाच्या भावभावना, त्यातले पेच, त्यांची सोडवणूक त्या-त्या व्यक्ती आपापल्या परीनं करत असतात. कधी त्यातून ही माणसं सहीसलामत बाहेर पडतात, तर कधी त्या संकटांनी खचून पार ढासळतात. संपतात. या सगळ्याचं पिळवटणारं चित्र चं. प्र. देशपांडे यांनी ‘मन’मध्ये रेखाटलं आहे. हा दीर्घांक म्हणजे नीलकंठ या सर्वसामान्य माणसाचं तितकंच प्रदीर्घ स्वगत आहे. त्यात खाचखळगे आहेत… सगळ्या मानवी भावभावना खच्चून भरल्या आहेत. मानवी मनाचा हा आलेख चं. प्रं. नी. तितक्याच सखोलतेने चित्रित केला आहे. पाहणाऱ्याला तो अस्वस्थ, विदीर्ण करतो. मानवी मनात काय काय घडत असतं याचं इतकं सूक्ष्म अवलोकन माणूस जगत असताना सहसा करत नाही. परंतु चं. प्रं. नी त्याचा उभा-आडवा छेद घेतला आहे.

दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी ‘मना’चा हा आलेख तितक्याच ताकदीनं मंचित केला आहे. शंभर मिनिटांचा हा एकपात्री स्वगतपर दीर्घांक सादर करणं हे मोठंच आव्हान होतं. त्यासाठी त्या ताकदीचा कलाकार मिळणंही आवश्यक होतं. रमेश वाणी या प्रायोगिक-व्यावसायिक रंगभूमीवरील कलावंतापाशी हा शोध संपला आहे. त्यांनी नीलकंठची घुसमट, अस्वस्थता, बेचैनी, उद्विग्नता, हायसेपण तितक्याच संयमाने, पोटतिडकीने अभिनयांकित केलं आहे. दिग्दर्शकाने या दीर्घांकाची लय, ताल, वेडावाकडा आलेख समर्थपणे सादर केला आहे. नेपथ्य, रंगमंचीय व्यवहार, नीलकंठची मनाची तडफड, तगमग यांना त्यांनी उद्गार दिला आहे. रमेश वाणी यांनी नीलकंठच्या व्यक्तिरेखेचे आरोह-अवरोह, त्याची निराशा, तगमगणं, संताप, चीड, हताशा संवादोच्चारांतून आणि देहबोलीतून तीव्रतेनं व्यक्त केली आहे. अनुच्चारीत उद्गार हेही कधी कधी महत्त्वाचे असतात. रमेश वाणी यांनी ते नेमक्या जागी पेरले आहेत. नीलकंठचं निवृत्तीपूर्व जगणं आणि निवृत्तीपश्चातचं सुटकेचा नि:श्वास सोडल्यानंतरचं जगणं पूर्णपणे वेगळं आहे. ते त्यांनी संयमिततेनं दाखवलं आहे. माणसाचं ‘मन:’पूत जगणं म्हणजे काय, हे ‘मन’मध्ये सर्वार्थानं पाहायला मिळतं.