रवींद्र पाथरे

नाटककार दत्ता पाटील गेल्या काही वर्षांत झपाटय़ानं पुढे आलेले नाशिकस्थित लेखक. ग्रामीण पार्श्वभूमी असलेले. आजूबाजूच्या अस्वस्थ करणाऱ्या वर्तमानाची पुरेपूर जाणीव आणि भान असलेले लेखक म्हणून ते परिचित आहेत. मुंबईतील एनसीपीएने आयोजित केलेल्या ‘दर्पण नाटय़लेखन उपक्रमा’त त्यांच्या ‘कलगीतुरा’ या नव्या नाटकाची सर्वोत्कृष्ट संहिता म्हणून निवड झाली आणि एनसीपीएने त्यांच्या ‘प्रतिबिंब नाटय़महोत्सवा’त या नाटकाची निर्मिती करून त्याचा प्रयोगही सादर केला. त्यास उपस्थित राहण्याचा योग आला. दत्ता पाटील यांच्या नवनवोन्मेषी सर्जनशीलतेचा रोकडा प्रत्यय देणारा हा ‘प्रयोग’ होता.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Muharram is celebrated without any Muslim family in the village where Maruti and Jyotiba temples are located
तळटीपा: गोदाकाठ ते गंगौली !
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
second phase of Taliye rehabilitation will be completed in June
तळीये पुनर्वसनाचा दुसरा टप्पा जूनमध्ये पूर्ण

१९९१ साली तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणासाठी देशाचे दरवाजे खुले केले आणि हे वारे रोरावत भारतभूमीत घुसले आणि आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चलनवलनाच्या आवर्ताने एकाएकी प्रचंड गती घेतली. आर्थिक घोडदौडीबरोबरच अनेकानेक क्षेत्रांवर त्याचे बरेवाईट परिणाम झाले. कमालीच्या व्यक्तिवादानं समष्टीची जागा बळकावली. सामाजिक मूल्यं आणि कला तसंच संस्कृतीचं सपाटीकरण ही त्याचीच फलनिष्पत्ती होय. या वादळात एतद्देशीय कलांचं नष्ट होणं  ही गोष्ट अपरिहार्य होती. लोकपरंपरेत रुजलेल्या अनेक कला या झंझावातात भुईसपाट झाल्या. पाश्चात्त्य संस्कृती, तिथल्या कलांचं नव्या पिढीला आकर्षण वाढलं. आपल्याकडच्या लोककला त्यांना ‘मागास’ आणि कालबाह्य़ वाटू लागल्या. साहजिकपणेच त्यांना अखेरची घरघर लागली. त्यावर आधारून असलेले लोक बेकार झाले. ती पिढी हळूहळू अस्तंगत होऊ लागली.

अशाच तऱ्हेची सातशे वर्षांची परंपरा असलेली ‘कलगीतुरा’ ही लोककला उत्तर महाराष्ट्रात तसंच विदर्भाच्या काही भागांत चालत आलेली. तिलाही उतरती कळा लागली. ती सादर करणारी माणसंही यथाकाल काळाच्या पडद्याआड जाऊ लागली. या अस्तंगत होत चाललेल्या लोकपरंपरेचं आख्यान म्हणजेच दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘कलगीतुरा’ ही नाटय़कृती होय.

डफ आणि तुणतुणे या वाद्यांनिशी सादर होणाऱ्या स्थानिक लावण्या, सवाल-जबाब, कूटप्रश्नांची जुगलबंदी असं एकंदर कलगीतुऱ्याचं स्वरूप असतं. त्यात भोवतालचे सामाजिक संदर्भही ठासून भरलेले असतात. समाजातील सगळ्या जातीधर्माचे लोक ही कला एकत्रितपणे सादर करीत असत.. जेणेकरून सामाजिक एकतेचा संदेश वेगळ्याने रुजवण्याची गरज भासत नसे. मनोरंजनाबरोबरच माहिती आणि ज्ञानप्रसार हेही कलगीतुऱ्याच्या रंगलेल्या सामन्यांतून साध्य होई. कलगीतुऱ्यात दोन तट असत. शक्तीवाले म्हणजे आदिशक्ती पार्वतीचे भक्त.. तर तुरेवाले म्हणजे शिवाचे भक्त. त्यांच्यात अटीतटीचे सामने होत. त्यातून एकीकडे लोकांचं रंजनही होत असे आणि त्यांच्या ज्ञानातसुद्धा भर पडे. अनौपचारिक शिक्षणाचाच हा प्रकार म्हणायला हरकत नाही. वरकरणी दोन्ही पक्षांत परस्परांशी उभा दावा असल्याचं भासत असलं तरी त्यांच्यात कटु वैरभाव नसे. त्याकाळी गावकी एकमेकांना धरून असे. कुणा अडल्यानडलेल्यांच्या साहाय्याला ही मंडळी धावून जात. विशेषत: कुणाच्या घरी रात्री-अपरात्री मृत्यू झाल्यास रात्र जागवायला कलगीतुरेवाले हमखास जात. तशी प्रथाच काही ठिकाणी प्रचलित होती. त्या घरातल्यांचं दु:ख हलकं करण्यासाठी ही रूढी म्हणजे एक प्रकारे मानसोपचारही असे. ‘या दु:खाच्या क्षणी तुम्ही एकटे नाही आहात, सगळा गाव तुमच्या सोबत आहे,’ हा दिलासा त्यातून घरातल्या मंडळींना मिळे.  

अशा या अस्ताचलाला निघालेल्या कलगीतुऱ्याचं नाटय़ाख्यान दत्ता पाटील यांनी यात लावलं आहे. कलगीतुरा या कलेचं संशोधन करण्याकरता एक तरुणी गावात येते आणि गावकऱ्यांकडून तिला ही कला उलगडून दाखविण्याच्या निमित्तानं हे नाटक आकारास येतं.

दत्ता पाटील यांनी कलगीतुरेवाल्यांचं आयुष्य यानिमित्तानं नाटकात मांडलं आहे; पण त्याचबरोबर गावातलं सौहार्द, गावकऱ्यांचं नितळ जगणंही त्यातून त्यांनी आपल्यासमोर उभं केलं आहे. शहरीकरणानं आणि जागतिकीकरणानं आपण काय काय गमावलं याचं भयाण भान त्यातून येतं. आज ‘माणूस’ म्हणून आपल्या संवेदना पार बोथट झाल्या आहेत. जगण्यातली सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव ही मूल्यंही आपण हरवून बसलो आहोत याची तीव्र जाणीव नाटक पाहताना होते. स्वार्थाने अंध झालेले राजकारणी आपल्याला कुठल्या कडेलोटाकडे घेऊन चाललेत याचं मन विदीर्ण करणारं दर्शन त्यातून होतं. त्यामुळे ही कथा कलगीतुरा सादर करणाऱ्या कुणा एका शाहीर सखारामनानांची किंवा शाहीर सीतारामतात्यांची न राहता ती वैश्विक झाली आहे. आपल्याला ‘माणूस’ म्हणून ती हडबडून जाग आणते.

दत्ता पाटील यांनी ‘कलगीतुरा’ किंचित डॉक्युड्रामाच्या बाजानं नेलं असलं तरी त्यात कुठंही शुष्कता येणार नाही याची पुरती दक्षता घेतली आहे. कलगीतुऱ्याच्या पुनरुज्जीवनाच्या निमित्ताने अवघं ग्रामीण जीवन त्यांनी आपल्यासमोर उभं केलं आहे. कलगीतुऱ्यातला जोश, त्याचं रांगडं स्वरूप, त्यातली नजाकत, कलगीतुरा सादर करणाऱ्या कलावंतांचं जगणं, त्यांची कलेवरची अव्यभिचारी निष्ठा आणि बदलत्या काळाबरोबर या कलेला आलेले वाईट दिवस.. हा सगळा पट लेखकानं कथानकाच्या ओघात नेमकेपणी मांडला आहे. दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी ही संहिता प्रयोगान्वित करण्याची जबाबदारी लीलया पार पाडली आहे. गावातील अनघड कलावंतांना घेऊन नाटक साकारणं हे येरागबाळ्याचं काम नोहे. परंतु त्यांनी अनघड हिऱ्यांना पैलू पाडत ते मोठय़ा ताकदीनं आकारलं आहे. संगीत आणि गायनाची उत्तम जाण असलेली ही कलावंत मंडळी आहेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर त्यांना अभिनयाचीही चांगली समज आहे याचा वानवळा ‘कलगीतुरा’मध्ये पाहता येतो. संगीतकार हृषिकेश शेलार यांची कामगिरीही वाखाणण्याजोगी झाली आहे. त्याने कलगीतुऱ्याला विश्वासार्हता प्राप्त करून दिली आहे. रोहित सरोदे यांचं पार्श्वसंगीतही नाटय़ांतर्गत प्रसंग गहिरं करणारं आहे. मोजक्याच नेपथ्यातून चेतन बर्वे यांनी उचित स्थलकालनिर्देश केला आहे. तर प्रणव सपकाळे यांनी प्रकाशयोजनेतून काही प्रसंग दृक्-काव्याच्या उंचीवर नेले आहेत. ललित कुलकर्णी (रंगभूषा) आणि कविता देसाई (वेशभूषा) यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.

यातले कलावंतही कसलेले आहेत. लोकपरंपरेची जाण त्यांना आहेच; त्याचबरोबर आवाजसाधना आणि अभिनयाचीही चांगली समज आहे. प्रत्येक प्रसंग त्यातल्या वैविध्यपूर्ण मूड्ससह त्यांनी लक्षवेधी केले आहेत. शाहीर सखारामनाना (हेमंत महाजन), शाहीर सीतारामतात्या (विक्रम नन्नावरे), सर्जेराव (निलेश सूर्यवंशी), शिवदास (राम वाणी), श्रीपतमामा (अरुण इंगळे), मधुकरभाऊ (ऋषिकेश शेलार) यांनी आपल्या भूमिकांना उत्तम न्याय दिला आहे. राजेंद्र उगले, कृष्णा शिरसाठ, प्रवीण जाधव, शुभम लांडगे, किरण रावबच्चे, वैभवी चव्हाण, समृद्धी गांगुर्डे, कविता देसाई आणि ऋषिकेश पाटील यांनी त्यांना छान साथ दिली आहे.

एक आगळावेगळा प्रयोग त्याच्या संपूर्ण सामर्थ्यांनिशी सादर केल्याबद्दल दत्ता पाटील, सचिन शिंदे आणि त्यांची कलावंत मंडळी यांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि कौतुक.

Story img Loader