नाशिकचे अलीकडच्या काळातील एक सशक्त नाटककार दत्ता पाटील आणि त्यांचे सहकारी दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी गेली काही वर्षे या मातीतली नाटकं मराठी रंगभूमीला दिली आहेत. ग्रामीण भागातील माणसांचं जगणं हा त्यांच्या कलाकृतींचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. नव्वदच्या दशकात भारतात जागतिकीकरणाचे, उदारीकरणाचे आणि खासगीकरणाचे वारे जोमाने प्रवेशते झाले. त्याचे बरे-वाईट परिणाम आपण आज अनुभवतो आहोतच. याच काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रचंड झपाट्याने झालेल्या प्रचार-प्रसाराने भौतिक प्रगतीची दारे समाजातील एका मोठ्या वर्गाला खुली झाली आणि ते झपाट्याने उच्चभ्रू, नवश्रीमंत वर्गात दाखल झाले. आधीचे श्रीमंत अधिकच श्रीमंत झाले. त्यामुळे जो मध्यमवर्ग पूर्वी अनेक लोकचळवळींत, सामाजिक मूल्यं जपण्यात पुढे असायचा तो आता आपल्या भराभर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे मांद्या आल्याने कुठल्याही चळवळींतून दिसेनासा झाला. तो आता ‘मी, माझं आणि माझ्या’पुरताच मर्यादित झाला आहे. त्याला समाजातल्या इतर वर्गांशी काही देणंघेणंच उरलेलं नाही. या उदारीकरणाच्या रेट्यामुळे श्रीमंत तर आणखीनच श्रीमंत होत आहेत. याआधीच ते समाजापासून फटकून होते. आता तर ते सत्ता, संपत्तीपायी कुणालाच जुमानेनासे झाले आहेत. आपले हितसंबंध सांभाळणारे राज्यकर्ते सत्तेत आणण्यापासून त्यांना खिशात बाळगण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. आणि याउलट तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगारवर्ग अधिकाधिक गर्तेत गेला आहे. त्यांची उपजीविकेची साधनं हिरावली गेली आहेत. त्यामुळे रोजच्या दिवसाची तोंडमिळवणी करणंही त्यांना दुरापास्त झालं आहे. पण शासन, सरकार किंवा प्रगतीची फळं चाखणाऱ्या वरच्या वर्गाला त्याचं काहीही सोयरसुतक वाटेनासं झालं आहे. एकीकडे लोकांना ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची स्वप्नं दाखवली जात आहेत, तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर हताश, वैफल्यग्रस्त शेतकरी वर्ष वर्ष आंदोलनं करत टाचा घासतो आहे. आणि तरीही त्याची कुणीच दखल घ्यायला तयार नाही. त्यांचं जगणं कुणाच्याच खिजगणतीत नाहीये. देशाचा वेगाने विकास होतो आहे असं केंद्र सरकार जाहिरातींतून, सभासंमेलनांतून आरडून ओरडून सांगत आहे. परंतु त्याचवेळी देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्यपुरवठ्याचं वास्तवही अधोरेखित होत आहे. झपाट्याने आर्थिक प्रगती करणाऱ्या (निदान तसं चित्र तरी निर्माण करणाऱ्या) देशाचं हे परस्परविसंगत चित्र नेमकं कशाचं निदर्शक आहे?

हेच ग्रामीण वास्तव आपल्या नाट्यकृतींतून मांडण्याचं काम लेखक दत्ता पाटील गेली काही वर्षं आपल्या नाटकांतून करत आहेत. त्यांची ‘हंडाभर चांदण्या’, ‘तो राजहंस एक’, ‘कलगीतुरा’ आणि ‘दगड आणि माती’ ही चारही नाटकं शेतकऱ्याचं, आपल्या इथल्या ग्रामीण वास्तवतेचं भयावह चित्र समाजासमोर मांडत आहेत. या चारही नाटकांचे एकत्रित प्रयोग ‘नाट्यचौफुला’ या उपक्रमांतर्गत ३० ऑगस्टला पुण्यात डॉ. श्रीराम लागू रंग-अवकाश येथे, तर १ सप्टेंबर रोजी (दुपारी २ ते रात्रौ १० पर्यंत) मुंबईत ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होत आहेत. एकाच दिवसात सलग चार नाटकं पाहून ग्रामीण भागातील वास्तवाचा समग्र नाट्यानुभव प्रेक्षकाला मिळावा अशी या उपक्रमामागची अपेक्षा आहे. पुण्यातील नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन लेखक डॉ. चंद्रशेखर फणसळकर आणि दिग्दर्शक मोहित टाकळकर हे, तर ठाण्यातील महोत्सवाचे उद्घाटन नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी करणार आहेत. या महोत्सवांचं तिकीटही सर्वांना परवडेल असं मुद्दामहून फक्त पाचशे रु.च ठेवण्यात आलेलं आहे. प्रत्येकी दीड तासाचे हे चार दीर्घांक प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहेत.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Rahul Gandhi Deekshabhoomi visit
राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट, अभ्यागत पुस्तिकेत लिहिला ‘हा’ संदेश… त्याची सर्वत्र चर्चा

‘हंडाभर चांदण्या’मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आजही अनेक ग्रामीण भागांत असलेलं पाण्याचं दुभिक्ष्य अधोरेखित करण्यात आलं आहे. अवघ्या हंडाभर पाण्यासाठी कित्येक तास प्रतीक्षा केल्यानंतर येणाऱ्या टॅंकरवर तुटून पडणाऱ्या बायाबापड्यांचं जगणं यात चित्रित केलेलं आहे. त्यातून निर्माण होणारे जगण्याचे आनुषंगिक प्रश्न आणि समस्या, त्यांना दुर्दम्य आशावादानं तोंड देणारी जिवट माणसं यांचं एक विलक्षण विदारक चित्र या नाटकात उभं केलेलं आहे.

‘तो राजहंस एक’मध्ये उच्चशिक्षित ग्रामीण तरुणाची तिथल्या कोंदट, घुसमटवून टाकणाऱ्या वातावरणात होणारी कोंडी, त्याची तारुण्यसुलभ कोमल स्वप्नं आणि त्यांचं परिस्थितीगत दुरावणं, त्याच्या सर्जनशील मनाचा होणारा कोंडमारा आणि पुढ्यातलं भयाण वास्तव यांचा एकमेळ यात पाहायला मिळतो.

‘कलगीतुरा’मध्ये जागतिकीकरणातून निर्माण झालेलं/ होऊ घातलेलं संस्कृती व कलांचं सपाटीकरण आणि त्या दुष्टचक्रात अडकलेलं आपलं सांस्कृतिक कलाजगत, परिणामी पाश्चात्य कलांच्या कच्छपि लागण्यातून एतद्देशीय कलांचं नष्टप्राय होत गेलेलं/ चाललेलं विश्व आणि त्यावरच आपल्या देशी कलासंस्कृतीचं भरणपोषण करणारे लोककलावंत, कलेच्या नष्टचर्यामुळे हताश झालेल्या या कलावंतांचं काळीज पिळवटणारं दु:ख या दीर्घांकात मांडलेलं आहे.

‘दगड आणि माती’मध्ये दुर्गम, बिनचेहऱ्याच्या गावातल्या तरुणांचं झाकोळलेलं तारुण्य आणि त्याची तीव्र जाणीव झाल्यावर त्यातून आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या गावाला स्वत:ची अशी एक ओळख, एक इतिहास मिळवून देण्यासाठीची त्यांची धडपड, त्यातले खाचखळगे, नकार… आणि शेवटी सांगण्यासारखा काहीच भरीव इतिहास हाती न लागल्याने आलेली हताशा, निराशा आणि त्यापोटी शहराकडे होणारं त्यांचं स्थलांतरण… असा व्यापक पट दत्ता पाटील यांनी या नाटकात चितारला आहे.

आजच्या शेतकऱ्यांच्या वास्तव जगण्याचा, त्यांच्या स्थिती-गतीचा धांडोळा घेणारी ही भिन्न आशय-विषयावरची चार नाटकं. आपल्या शहरी जाणिवांना काहीसा धक्का देणारी… वास्तवाचं भान देणारी. नागर आणि अनागर समाजांतील कधीच भरून न निघणारी दरी सांधू पाहणारी! असा हा आगळा ‘नाट्यचौफुला’ कुठल्याही संवेदनशील रसिकाने चुकवू नये असाच.

(हंडाभर चांदण्या)