नाशिकचे अलीकडच्या काळातील एक सशक्त नाटककार दत्ता पाटील आणि त्यांचे सहकारी दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी गेली काही वर्षे या मातीतली नाटकं मराठी रंगभूमीला दिली आहेत. ग्रामीण भागातील माणसांचं जगणं हा त्यांच्या कलाकृतींचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. नव्वदच्या दशकात भारतात जागतिकीकरणाचे, उदारीकरणाचे आणि खासगीकरणाचे वारे जोमाने प्रवेशते झाले. त्याचे बरे-वाईट परिणाम आपण आज अनुभवतो आहोतच. याच काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रचंड झपाट्याने झालेल्या प्रचार-प्रसाराने भौतिक प्रगतीची दारे समाजातील एका मोठ्या वर्गाला खुली झाली आणि ते झपाट्याने उच्चभ्रू, नवश्रीमंत वर्गात दाखल झाले. आधीचे श्रीमंत अधिकच श्रीमंत झाले. त्यामुळे जो मध्यमवर्ग पूर्वी अनेक लोकचळवळींत, सामाजिक मूल्यं जपण्यात पुढे असायचा तो आता आपल्या भराभर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे मांद्या आल्याने कुठल्याही चळवळींतून दिसेनासा झाला. तो आता ‘मी, माझं आणि माझ्या’पुरताच मर्यादित झाला आहे. त्याला समाजातल्या इतर वर्गांशी काही देणंघेणंच उरलेलं नाही. या उदारीकरणाच्या रेट्यामुळे श्रीमंत तर आणखीनच श्रीमंत होत आहेत. याआधीच ते समाजापासून फटकून होते. आता तर ते सत्ता, संपत्तीपायी कुणालाच जुमानेनासे झाले आहेत. आपले हितसंबंध सांभाळणारे राज्यकर्ते सत्तेत आणण्यापासून त्यांना खिशात बाळगण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. आणि याउलट तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगारवर्ग अधिकाधिक गर्तेत गेला आहे. त्यांची उपजीविकेची साधनं हिरावली गेली आहेत. त्यामुळे रोजच्या दिवसाची तोंडमिळवणी करणंही त्यांना दुरापास्त झालं आहे. पण शासन, सरकार किंवा प्रगतीची फळं चाखणाऱ्या वरच्या वर्गाला त्याचं काहीही सोयरसुतक वाटेनासं झालं आहे. एकीकडे लोकांना ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची स्वप्नं दाखवली जात आहेत, तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर हताश, वैफल्यग्रस्त शेतकरी वर्ष वर्ष आंदोलनं करत टाचा घासतो आहे. आणि तरीही त्याची कुणीच दखल घ्यायला तयार नाही. त्यांचं जगणं कुणाच्याच खिजगणतीत नाहीये. देशाचा वेगाने विकास होतो आहे असं केंद्र सरकार जाहिरातींतून, सभासंमेलनांतून आरडून ओरडून सांगत आहे. परंतु त्याचवेळी देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्यपुरवठ्याचं वास्तवही अधोरेखित होत आहे. झपाट्याने आर्थिक प्रगती करणाऱ्या (निदान तसं चित्र तरी निर्माण करणाऱ्या) देशाचं हे परस्परविसंगत चित्र नेमकं कशाचं निदर्शक आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा