PM Modi at National Creator Award: आज (८ मार्च रोजी) सर्वत्र महिला दिन साजरा केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारत मंडपम इथे पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कारासाठी तीन आंतरराष्ट्रीय क्रिएटर्सबरोबर भारतातील २३ क्रिएटर्सना पुरस्कार देण्यात आले.
आज महिला दिन आणि महाशिवरात्रीही आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माझ्या काशीत भगवान शिवाशिवाय काहीही चालत नाही. भगवान शिव यांना भाषा, कला आणि क्रिएटिव्हीटीचे निर्माता मानलं जातं.” पुढे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देत मोदी म्हणाले, “मी हे पहिल्यांदाच पाहतोय की येथे पुरुषही टाळ्या वाजवत आहेत. मी थोड्यावेळापूर्वीच गॅस सिलिंडरचे दर कमी करून आलो आहे.”
पुरस्काराची सुरुवात करत नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरला ‘कल्चरल अँबेसिडर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित केलं. मैथिलीला पुरस्कार देताना नरेंद्र मोदी म्हणाले, “आता गाणं गाऊनच जा, कारण माझं भाषण ऐकून लोक थकून जातात.” यावर मैथिलीने महाशिवरात्री निमित्त एक सुंदर शिव भजन गायलं.
कथा वाचक जया किशोरीला सामाजिक परिवर्तनासाठी ‘बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज’चा पुरस्कार मोदींनी दिला. तर शिक्षण श्रेणीत मराठमोळ्या नमन देशमुखला ‘सर्वोत्कृष्ट लेखका’चा पुरस्कार प्रदान केला.
हेही वाचा… ‘या’ कारणामुळे करण जोहर अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात होता गैरहजर; जामनगरला निघण्याआधीच…
निश्चय याला गेमिंग क्षेत्रात ‘सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार’ तर अंकित बैयनपुरियाला ‘सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस क्रिएटरचा’ पुरस्कार मिळाला. एवढंच नाही तर ड्रू हिक्सला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय निर्माता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क्रिएटर्सला संबोधित करत नरेंद्र मोदी म्हणाले, “तरुण पिढीला आणि त्यांच्या क्रिएटिव्हीटीला सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार पहिल्यांदा आयोजित केला गेला आहे. या पुरस्कारामुळे क्रिएटर्सला प्रेरणा मिळेल.”