पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी ट्विट करत ही माहिती दिली. हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटाला होणाऱ्या विरोधामुळे आणि सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी न मिळाल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. ‘विरोधक आमच्या चित्रपटाला पुढे ढकलू शकतात पण आम्हाला थांबवू शकत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयने ‘एएनआय’शी बोलताना दिली.
‘सर्वोच्च न्यायालयाचे काही नावाजलेले वकील यांच्यासह अनेक सामर्थ्यशाली व्यक्ती या चित्रपटाच्या विरोधात आहेत. पण प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असली तरी तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही,’ असं विवेक म्हणाला. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोदींचा बायोपिक ५ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हणत काही राजकीय पक्षांनीही या चित्रपटाला विरोध दर्शविला आहे.
https://twitter.com/sandip_Ssingh/status/1114166429383897088
यासंदर्भात निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवत या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी परवानगी द्यायची कि नाही हे बोर्डाने ठरवावे, त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल असे स्पष्ट केले होते. अखेर हा चित्रपट येत्या ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. विवेकसोबतच यामध्ये बमन इराणी, दर्शन कुमार, झरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.