रेश्मा राईकवार

मनाच्या गाठी सोडवणं हे सहजसोपं काम नाही. कुठेतरी काहीतरी चुकतं आहे, काहीतरी सुधारायला हवं आहे, काहीतरी बोलायला हवं आहे, काहीतरी शांत राहून समजून घ्यायला हवं आहे, हे आपल्यालाही मनाशी जाणवत राहतं. मात्र ते नक्की काय चुकतं आहे, काय हवं आहे याचा थांग मनाच्या तळाशी शिरूनही लागत नाही. मग अस्वस्थता वाढत जाते, आपली म्हणवणारी माणसंही कोरडी, अलिप्त वाटू लागतात. ना नाती पटत, ना देव, ना कर्म.. प्रत्येक गोष्टींचं जोखड वाटत राहतं. त्यातून मुक्तीसाठी धडपड सुरू होते. हा मुक्तीचा क्षण मोठा मजेदार. तो कधी मनाला साद घालत पैलतीराला नेईल हे सांगता येत नाही. पण मुळात त्यासाठी खळाळत्या गोदेसारखं वाहतं राहिलं पाहिजे, वाहता वाहता आपल्या तीरावर विसावलेल्या माणसांना, गावांना, परंपरांना जोडून घेतलं पाहिजे. जगण्यातल्या अस्वस्थतेतून मनाच्या स्वस्थतेकडे होणारा हा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न ‘गोदावरी’ नामक काहीशा काव्यात्म भावपटातून झाला आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Heart-Melting Video
VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग

एखाद्या चित्रपटाचं कथाबीज खूप मोठं असेल असं नाही, पण एखादी भावना ये हृदयीचे ते हृदयी घातले. हृदया हृदय एक झाले, याची प्रचीती देणारा ‘गोदावरी’ हा चित्रपट मराठीतला एक वेगळा प्रयोग म्हटला तर ते वावगं ठरणार नाही. कोण्या जिवलगाच्या जाण्यातून आलेली अस्वस्थता कागदावर कवितेच्या रूपात मोकळी झाली. तो अस्वस्थ भाव नेमका टिपू शकणाऱ्या आणखी दोन सर्जनशील मनांनी ते कथेचं बीज आपल्या जाणिवा-नेणिवेचं खतपाणी घालत मोठं केलं. काव्यात्म संवेदना असणारा लेखक प्राजक्त देशमुख आणि त्याने लिहिलेल्या शब्दांपलीकडला भाव पडद्यावर उतरवू शकणारा दिग्दर्शक निखिल महाजन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून गोदावरीच्या तीरावर राहणाऱ्या या निशिकांतची कथा उलगडली आहे. एखादा विचार, जाणीव, संवेदना कलाकृतीच्या माध्यमातून उलगडताना ती निर्मात्यापासून कलाकारांपर्यंत त्याच ठाशीवपणे पोहोचावी आणि पडद्यावर ते पाहताना प्रेक्षकांच्या मनालाही सहज भिडावी असा चित्रपट पाहण्याचा योग क्वचितच मिळतो. ‘गोदावरी’ने प्रेक्षकांना हा तरल अनुभव दिला आहे. या चित्रपटाला ठोस अशी कथा नाही, आहेत त्या भावभावना..

स्वत:च्या मनासारखं काही करता आलं नाही याचा सल, परंपरागत भाडेवसुलीचा धंदा अंगावर जोखड असल्यागत घेऊन वावरणारा, सगळय़ा जगावर नाराज असलेला निशिकांत. आईवडील, आजोबा, पत्नी आणि लहान मुलगी या सगळय़ांना सोडून निशी स्वतंत्रपणे एका वेगळय़ा खोलीत राहतो आहे. ‘मारुतीच्या पायाला पाणी लागलं का?’, हा एकच प्रश्न विचारणारे भ्रमिष्ट आजोबा, आपल्याशी एकही शब्द न बोलणारे वडील, या सगळय़ात पिचलेली तरी खंबीरपणे घर सांभाळणारी आई आणि अबोल साथ देणारी पत्नी हे सगळंच निशीला अस्वस्थ करतं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं हे न उमगणाऱ्या निशीला भविष्यातील दुर्दैवाची चाहूल लागते. जगण्याचा उद्देश शोधत फिरणाऱ्या निशीचं आयुष्यच त्याने बदलून जातं. गोदेच्या तीरावर येऊन तिच्याकडे पाहत एकटक विचार करत बसणारा, मनातून या नदीचा प्रचंड राग करणारा निशी हळूहळू बदलत जातो. मैय्या मैली हो सकती है, गंदी कैसे होगी?, हा गोदावरीच्या काठावर साधूशी झालेला संवाद, त्याला भेटत गेलेली माणसं, आपल्या माणसांशी मोकळा होत गेलेला संवाद यातून निशीचा दृष्टिकोन बदलत जातो. कितीतरी पिढय़ा, वर्ष गेली तरी सतत वाहती असणारी गोदावरी, क्षणोक्षणी बदलत जाणारी, कधी पुराचं उग्र रूप धारण करणारी, तर कधी खळखळ वाहणारी, लोकांच्या मनात घट्ट रुंजी घालणारी ही नदी हा निशी आणि त्याच्या बदलत गेलेल्या व्यक्तित्व यातला दुवा आहे. निशिकांतची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता जितेंद्र जोशीला या भूमिकेपासून वेगळं काढताच येणार नाही इतकी ती त्याच्यात भिनली आहे. विक्रम गोखले यांचा नुसता वावर, त्यांची भिरभिरती नजरही अर्थपूर्ण ठरते. नीना कुलकर्णी आणि संजय मोने या प्रतिभावंत कलाकारांना खूप काळाने एका सशक्त भूमिकांमध्ये पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. या सगळय़ात नवखी असूनही ज्या सहजतेने अभिनेत्री गौरी नलावडे हिने निशीला अबोल साथ देणाऱ्या त्याच्या पत्नीची भूमिका उत्तमपणे साकारली आहे. प्रियदर्शनचा कासवही तितकाच भावणारा आहे. चित्रपटाच्या शेवटी येणारे राहुल देशपांडे यांच्या आवाजातील ‘खळखळ गोदा’ हे गाणेही आपल्याला अंतर्बाह्य हलवून टाकते.

मोजक्याच पण अर्थपूर्ण व्यक्तिरेखा, साधे-सरळं संवाद आणि कलाकारांचा निखळ-सहज अभिनय याच्या जोरावर ‘गोदावरी’चा हा कथाप्रवाह आपल्यालाही कवेत घेऊन पुढे पुढे नेत राहतो. शेवटी ज्याचा त्याचा पैलतीर त्यानेच गाठायचा असतो. त्यामुळे पाहणाऱ्याने या चित्रपटातलं कायं घ्यावं, काय न घ्यावं हे ज्याच्या त्याच्या मनावर.. मात्र हा प्रवाह आपल्याला पुन्हा एकमेकांशी जोडून घ्यायला शिकवतो हेही खरं..

गोदावरी:-दिग्दर्शक – निखिल महाजन
कलाकार – जितेंद्र जोशी, संजय मोने, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, मोहित टाकळकर.

Story img Loader