दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट न घातल्याने अभिनेत्री सारा अली खानविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत सारा दुचाकीवरून प्रवास करत होती. यावेळी कार्तिक बाइक चालवत होता आणि सारा मागे बसली होती. पण साराने हेल्मेट न घातल्याने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून नेटकऱ्यांनीही तिला ट्रोल केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची दखल घेत दिल्ली पोलिसांनी ही तक्रार दाखल केली आहे. ट्रॅफीक पोलीस साराविरोधात कारवाई करू शकतात अशी नोटीससुद्धा साराला बजावण्यात आली आहे.

सारा आणि कार्तिक आगामी ‘लव्ह आज कल २’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. दिल्लीत या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. सारा-कार्तिक बाइक राइड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सेलिब्रिटी असून वाहतूक सुरक्षेचे नियम न पाळणं हा बेजबाबदारपणा आहे असं म्हणत साराला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.

इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. या चित्रपटात सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुडासुद्धा भूमिका साकारत आहे. पंजाब आणि दिल्लीत याची शूटिंग पार पडणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police complaint filed against sara ali khan for riding pillion without helmet