उद्योगपती नेस वाडियावर विनयभंगाचा आरोप करणारी अभिनेत्री प्रिती झिंटाच्या अर्जावर पोलिसांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रितीला पुढील तीन दिवसांत आपला जबाब देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रिती आणि नेसमध्ये यापूर्वी जरी वाद असला तरी ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर नेमके काय झाले त्याचाच सध्या पोलीस तपास करत आहेत. अभिनेत्री आणि आयपीएल मधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाची मालकिण असलेल्या ३९ वर्षीय प्रितीने माजी प्रियकर नेस वाडिया (४४) याने शिविगाळ करून विनयभंग केल्याची तक्रार मंगळवारी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दिली होती. प्रितीने इंग्रजीत दिलेल्या अर्जावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अर्जानंतर प्रिती लगेच दुसऱ्या दिवशी परदेशी रवाना झाली. या अर्जातून अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळालेली नाहीत. नेमक्या कोणासमोर ही शिवीगाळ झाली, पहिला प्रकार कधी घडला यासह अनेक बाबी स्पष्ट नाहीत. त्यामुळेच सोमवारी पोलिसांनी प्रितीच्या वकिलामार्फत तिला एक पत्र दिले असून तिला येत्या तीन दिवसात आपला जबाब देण्यास सांगण्यात आले आहे.
आम्ही या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत असून तिला जबाबासाठी पत्र दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) रवींद्र शिसवे यांनी दिली.