अभिनेत्री माधुरी दीक्षितला धमकीचे एसएमएस पाठविणाऱ्याला सायबर सेल पोलिसांनी अटक केली. गँगस्टर छोटा राजनचे नाव घेत माधुरीच्या मुलांना मारण्याची धमकी त्याने दिली होती. २५ नोव्हेंबरला माधुरीच्या व्यवस्थापिकेला मोबाइलवर पहाटे तीनच्या सुमारास चार एसएमएस आले. छोटा राजनने काही गुंड या अभिनेत्रीच्या घरी जाऊन काहीही करू शकतील, अशा आशयाची धमकी देण्यात आली होती.
मुले जिवंत राहावी असे वाटत असेल तर माधुरीने माझ्याशी संपर्क साधावा, असा हिंदीत एसएमएस पाठवला होता. यानंतर व्यवस्थापिकने थेट सायबर सेल पोलीस ठाणे गाठले. ज्या मोबाइलवरून एसएमएस आले होते, त्या मोबाइलच्या टॉवर लोकेशनचा आणि इतर तांत्रिक पद्धतीचा वापर करून या २३ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपी हा मूळचा छत्तीसगड येथील रहिवासी असून तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी दिली.