दलित समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पुथिया तमिजाघम या राजकीय पक्षाने अभिनेता आणि ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालक कमल हसन यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. कमल हसन आणि एका दाक्षिणात्य वाहिनीवर झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तमिळ ‘बिग बॉस’च्या मंचावर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर हा आरोप लावण्यात आला. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला या पक्षाचे संस्थापक आणि संचालक के. कृष्णसामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल हसन यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून, सात दिवसांच्या आत कोणत्याही अटींशिवाय माफी मागण्याची विचारणा करण्यात आली आहे. जर असं झालं नाही तर त्यांच्यावर मानहानीचा आरोप लावत १०० कोटींच्या रकमेची मागणी करण्यात येणार आहे.
अभिनेता कमल हसन यांच्याशिवाय ‘स्टार विजय टिव्ही’चे महाव्यवस्थापक अजय विद्यासागर, मुंबईतील ‘एंडेमोल शाइन इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक धर आणि गायत्री रघुराम यांच्या नावेही नोटीस पाठवली आहे. गायत्री रघुरामने या कार्यक्रमादरम्यान एका अभिनेत्यावर कमेंट केली. यावेळी तिने झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं उदाहरण दिलं त्यामुळेच या वादाला तोंड फुटलं. त्यामुळे या वक्तव्याने खालच्या जातीतील लोकांचा अपमान झाला, असं मत कृष्णसामी यांनी मांडलं.
वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या
सध्या हा कार्यक्रम दाक्षिणात्य प्रेक्षकांची मनं जिंकत असून, यातून प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआरनेही टेलिव्हीजन विश्वात पदार्पण केलं आहे. सध्याच्या घडीला इतक्या मोठ्या पातळीवर निर्मिती करण्यात आलेला ‘बिग बॉस’ हा एकमेव तमिळ टेलिव्हिजन कार्यक्रम ठरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दहा हजार चौरस फुटांच्या परिसरात बिग बॉसचं हे आलिशान घर उभं आहे. यामध्ये ६० कॅमेरे स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. पण, आता मात्र या रिअॅलिटी शोसमोर एक नवा पेच उभा राहिला आहे असंच म्हणावं लागेल.
वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती