विजया जांगळे

‘पोन्नियन सेल्वन- २’ शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. फोरडीएक्स स्वरूपात प्रदर्शित होणारा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट असल्याचा दावा केला जातो आहे. मूळ चित्रपट तमिळ भाषेत आहे, मात्र तमिळनाडूतल्या रसिकांना हा फोरडीएक्स अनुभव घेता येणार नाही. कारण संपूर्ण तमिळनाडूत एकही फोरडीएक्स चित्रपटगृह नाही. असं का? प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असा अनुभव देणाऱ्या फोरडीएक्स आणि आयमॅक्सचं देशात दुर्भिक्ष का?
भारतात पहिलं आयमॅक्स थिएटर २००१ साली वडाळय़ात सुरू झालं आणि सध्या देशभरात मिळून केवळ २३ आयमॅक्स स्क्रीन आहेत. देशातलं पहिलं फोरडीएक्स थिएटर ठाण्यात २०१४ साली सुरू झालं आणि आज देशभरात मिळून केवळ १० फोरडीएक्स स्क्रीन्स आहेत. ही दोन्ही तंत्र प्रेक्षकाला इमर्सिव्ह एक्सपिरिअन्स देतात. आपणही त्या चित्रपटाचाच भाग आहोत, असा आभास निर्माण करतात. आयमॅक्सच्या स्क्रीन भव्य असतात, ध्वनियोजनाही प्रभावी असते, तर फोरडीएक्समध्ये प्रेक्षकाला चित्रपट जगत असल्याचा अनुभव देण्यासाठी समोरच्या दृश्याप्रमाणे खुच्र्या हलतात, पाणी उडतं, धूर, गंध, बुडबुडे, वाऱ्याचे झोत निर्माण होतात. पण हे मजेदार अनुभव देशातल्या अनेक शहरांत घेताच येत नाहीत. (अर्थात कित्येक गावांत अद्याप एकपडदा चित्रपटगृहही नाहीत.) असं का?

tujhe meri kasam genelia and riteish deshmukh evergreen movie
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! टीव्हीवर एकदाही न दाखवलेला रितेश-जिनिलीयाचा चित्रपट तब्बल २१ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bollywood theme park, Metro, mumbai,
मुंबई : चित्रपट सृष्टीचा इतिहास उलगडणार, मेट्रो मार्गिकेतील खांबांखालील बॉलीवूड थीम पार्क साकारण्यास सुरुवात
amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
old bollywood gang of vasepur and marathi tumbad movie rerealse in theatre
‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी
rehnaa hai terre dil mein releases again in the theatres
पहिल्या नजरेत प्रेम, हिरोने लपवली ओळख अन्…; २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ रोमँटिक चित्रपट! आजही प्रत्येक गाणं आहे सुपरहिट
semiconductor industry overview extreme ultraviolet lithography in semiconductor industry
चिप-चरित्र : ‘ईयूव्ही’ तर हवं; पण जपान नको…

उत्तम आशयाची कमतरता हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. वर्षांचे आठवडे ५२. चित्रपटगृहांचं आर्थिक गणित या ५२ आठवडय़ांवर बेतलेलं असतं. भारतात वर्षांकाठी विविध भाषांतले मिळून सरासरी १५०० चित्रपट प्रदर्शित होतात, मात्र यात फोरडीएक्स किंवा आयमॅक्स तंत्रज्ञानाचा वापर केलेले जास्तीत जास्त १० चित्रपट असतात. त्यातही पुरेशी गुंतवणूक आणि प्रसिद्धी केलेला, दमदार आशय असलेला एखादाच असतो. हॉलीवूडमध्येही वर्षांकाठी या प्रकारातले अवघे पाच-सहाच मोठे चित्रपट प्रदर्शित होतात. एक चित्रपट सरासरी दोन ते तीन आठवडे चित्रपटगृहात सुरू राहतो. म्हणजे या आधुनिक तंत्रांनी सज्ज असलेल्या चित्रपटगृहांचा गल्ला वर्षांकाठी केवळ १५ ते २० आठवडेच भरतो. उर्वरित काळ ही चित्रपटगृहं ओस पडलेली असतात. मग कोणत्याही सामान्य चित्रपटाचे खेळ करून, सामान्य तिकीटदर आकारून गुंतवलेले पैसे अगदी नगण्य प्रमाणात का असेनात, पण वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो.

आयमॅक्सच्या केवळ स्क्रीनसाठीच सामान्य स्क्रीनच्या तिप्पट खर्च करावा लागतो. हे सारंच भव्यदिव्य प्रकरण असतं. एवढा मोठा स्क्रीन लावायचा तर थिएटरही तेवढं प्रशस्त असावं लागतं. ध्वनियंत्रणेवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे जागा आणि तंत्रज्ञान अशा दोन्हीचा खर्च प्रचंड असतो. फोरडीएक्सला स्क्रीनसाठी फार खर्च करावा लागत नाही, मात्र सामान्य चित्रपटगृहातल्या एका खुर्चीची किंमत पाच हजारांपासून सुरू होते, तर फोरडीएक्स चित्रपटगृहातली एक खुर्ची किमान ५० हजार रुपयांची असते. आयमॅक्सप्रमाणे फोरडीएक्ससाठी फार मोठय़ा थिएटरची गरज नसते.
चित्रपट आयमॅक्स किंवा फोरडीएक्समध्ये रूपांतरित करण्याचा खर्च प्रचंड असतो. हॉलीवूडमध्ये चित्रपटाचं बजेट ५०० दशलक्ष रुपयांपासून सुरू होतं. ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’चं बजेट दोन हजार ८७१ कोटी रुपये एवढं प्रचंड होतं. आपल्याकडे बिग बजेट चित्रपट ठरलेल्या ‘आरआरआर’वर ५५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. येऊ घातलेल्या ‘पोन्नियन सेल्वन- २’ चं बजेट ५०० कोटींचं आहे. गुंतवणुकीतला हा फरक दर्जात प्रतिबिंबित होतोच.

याविषयी चित्रपट व्यवसाय सल्लागार म्हणून कार्यरत असलेले मोहन उमरोटकर सांगतात, भारतात चित्रपटाच्या बजेटचा बराचसा भाग दिग्दर्शक आणि कलाकारांच्या मानधनावर खर्च होतो. त्यामुळे पुढे व्हीएफएक्स वगैरेसाठी फारसे पैसेच उरत नाहीत. हे तंत्रज्ञान प्रभावी आहे, त्यामुळे आशयनिर्मितीही तेवढी प्रभावी असावी लागते, तरच प्रेक्षक आकर्षित होतात. सायन्स फिक्शन किंवा अॅक्शन चित्रपट असेल तर त्यात थरार असतो. आयमॅक्सच्या भव्य स्क्रीनमुळे किंवा फोरडीएक्सच्या वातावरणनिर्मितीमुळे त्याचा पुरेपूर अनुभव घेता येतो. आपल्याकडे अशा आशयनिर्मितीची क्षमता असलेल्या व्यक्ती आहेत, पण त्यांच्या कल्पनेला पुरेसं आर्थिक पाठबळ लाभत नाही. ‘भोला’ आयमॅक्समध्ये प्रदर्शित झाला, मात्र चाललाच नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत या स्वरूपाचे प्रयोग सुरू आहेत, मात्र हॉलीवूडपुढे आपण आजही शैशवावस्थेतच आहोत.

उमरोटकर यांच्या मते महागडं तिकीट ही फार मोठी समस्या नाही. तंत्रज्ञानाला न्याय देऊ शकेल अशा सशक्त आशयाचा अभाव, ही खरी समस्या आहे. चार जणांचं कुटुंब आयमॅक्स किंवा फोरडीएक्समध्ये जातं तेव्हा माणशी ८०० ते १२०० रुपये तिकीट गृहीत धरलं तरी तिकिटाचेच बत्तीसशे रुपये होतात. पॉपकॉर्न वगैरे धरून खर्च पाच हजारांच्या घरात जातो. एवढा खर्च केवळ गंमत म्हणून करायचा तर तीन-चार महिन्यांतून एकदाच परवडतो. पण खरोखरच नवा अनुभव मिळणार आहे, थरारक प्रसंग आहेत, उत्तम व्हीएफएक्स आहेत, नेत्रदीपक दृश्यं आहेत, असा विश्वास वाटू लागला तर प्रेक्षक खर्च करतील.

गेल्या काही वर्षांत या तंत्रांवर आधारित चित्रपटांची यादी वाढू लागली आहे. आयमॅक्स कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गेलफाँड यांनी फेब्रुवारीमध्ये भारतभेटी दरम्यान भारत ही आयमॅक्ससाठी अतिशय महत्त्वाची बाजारपेठ असून २०२२ मध्ये भारतात अमेरिकेएवढाच व्यवसाय झाल्याचं म्हटलं होतं. भारतातही अशा स्वरूपाची अनुभवनिर्मिती करण्याची धडपड वेग घेऊ लागली आहे. द्विमितीय चित्रपट पाहत मोठय़ा झालेल्या पिढीपेक्षा जेन झी हा या अनुभवाचा खरा चोखंदळ ग्राहक ठरणार आहे. व्हीआर आणि गेमिंगने त्यांच्या अपेक्षा फार वाढवल्या आहेत. आपल्या समोर जे सुरू आहे ते खरोखरच खास आहे की केवळ मोठय़ा आकारातल्या प्रतिमा आणि थीम पार्कसारख्या हलत्या खुच्र्या आहेत हे ओळखण्याची क्षमता या वर्गात आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना चित्रपटक्षेत्राचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. आयमॅक्स किंवा फोरडीएक्स चित्रपट तयार करताना सध्या तरी भारतीय चित्रपट असा दृष्टिकोन ठेवून भागणार नाही. इथे व्यवसाय करायचा असेल, नफा मिळवायचा असेल, तर जागतिक दर्जाचा आणि जगभरातील प्रेक्षकांसाठीचाच आशय निर्माण करण्याला पर्याय नाही.