दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियिन सेल्वन २’ चित्रपटात आपल्या सुमधूर आवाजाने गाणी गाणारी गायिका रक्षिता सुरेशचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी तिची कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. हा अपघात अतिशय भीषण होता, मात्र रक्षिता थोडक्यात बचावली. तिने सोशल मीडियावरून याबद्दल माहिती दिली.
रविवारी सकाळी रक्षिता मलेशियाच्या विमानतळाच्या दिशेने कारने जात होती आणि त्यादरम्यान तिची कार दुभाजकावर आदळली. हा अपघात भयानक होता मात्र, एअरबॅगमुळे ती वाचली. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून या घटनेची माहिती दिली. “आज एक मोठी दुर्घटना घडली. मी ज्या गाडीतून प्रवास करत होते ती गाडी दुभाजकाला धडकली. मी मलेशियातील विमानतळावर जात असताना हा अपघात झाला. अपघातादरम्यान त्या १० सेकंदात, माझे संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर होते. मी एअरबॅगमुळे वाचले, नाहीतर परिस्थिती आणखी बिकट असती. माझ्याबरोबर जे घडलं, त्याचा विचार करून मी अजूनही धक्क्यात आहे. समोरच्या सीटवर बसलेले ड्रायव्हर आणि इतर सहप्रवासी सुखरूप आहेत याचा मला आनंद आहे. काही किरकोळ जखमा झाल्या आहेत पण आम्ही बचावलो,” असं तिने पोस्टमधून सांगितलं.
रक्षिताने सांगितलं की या घटनेचा विचार करून ती अजूनही थरथरत आहे. अपघाताची भीषणता सांगत ती म्हणाली की त्या १० सेकंदात तिच्या डोळ्यांसमोरून तिचं अख्खं आयुष्य गेलं. रक्षिताने दक्षिणेतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. तिने आतापर्यंत तामिळ, हिंदी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.