प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपट मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मुख्य भूमिका असून या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पोन्नियन सेल्वन’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि अप्रतिम व्हीएफएक्सचं मिश्रण पाहायला मिळत आहे. हा टीझर पाहिल्यावर अनेकांना ‘बाहुबली’ चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहिलेली नाही. याशिवाय अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लुकनं सर्वांची मनं जिंकली आहेत.
‘पोन्नियन सेल्वन’चा जवळपास १ मिनिट २० सेकंदाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. या टीझरमध्ये व्हीएफएक्सची कमाल पाहायला मिळत आहे. भव्य सेट, अप्रतिम व्हीएफएक्स आणि युद्धाचे जबरदस्त अॅक्शन सीन यासोबतच ऐश्वर्याचा चित्रपटातील लुक सर्वांचं लक्ष वेधून घेतो. टीझरच्या सुरुवातीला अभिनेता विक्रमच्या आवाजातील, ‘मदिरा, गान, रक्त और युद्ध, सबकुछ भुलाने के लिए, उसको भुलाने के लिए और अपने आप को भुलाने के लिए’ हा दमदार संवाद ऐकू येतो. ज्यामुळे अंगावर अक्षरशः शहारे येतात.
या चित्रपटाची कथा ही १० व्या शतकात दक्षिण भारतावर राज्य करणाऱ्या चोळ सामाज्याची शक्ती आणि संघर्ष यावर आधारित आहे. ‘पोन्नियन सेल्वन’च्या टीझरनंतर व्हीएफएक्स इफेक्टसोबत स्टारकास्टबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच कलाकारांचे लुक समोर आले आहेत. टीझरमध्ये एकीकडे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्रिशा यांच्या लुकचं बरंच कौतुक होताना दिसत आहे. तर दुसरीकडे विक्रम, कार्ति, जयम रवि, प्रकाश राज, नस्सर, शोभिता धूलिपाला, प्रभु आणि किशोर या सर्वच कलाकारांचे लुक सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
आणखी वाचा- ऐश्वर्याच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ; ‘पोन्नियिन सेलवन’ सिनेमातील लूक रिलीज
‘पोन्नियन सेल्वन’चा हा टीझर ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा हिंदी टीझर अभिनेता अमिताभ बच्चन, मल्याळम टीझर मोहनलाल, कन्नड टीझर रक्षित शेट्टी, तमिळ टीझर सूर्या आणि तेलुगू टीझर महेश बाबू यांनी लॉन्च केला. काही मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचं एकूण बजेट हे ५००कोटी रुपये एवढं असून हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.