बी- टाऊनमध्ये सध्याच्या घडीला बराच चर्चेत असणारा एक विषय म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं रिलेशनशिप. करिअरच्या वाढत्या आलेखामुळे आलिया प्रकाशझोतात आहेच. पण त्यापेक्षा कैकपटीने तिच्या खासगी आयुष्यात नक्की काय सुरु आहे, या घडामोडींवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटामध्ये आलिया -रणबीर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या दोघांची चर्चा सुरु आहे. मात्र या चर्चांपेक्षा त्यांची ऑफस्क्रीन चर्चा सर्वाधिक होत आहे. त्यांच्या रिलेशनशीपविषयी आलियाची मोठी बहीण पूजा भट्टनेदेखील तिचं मत व्यक्त केलं आहे.
“आलिया आता मोठी झाली आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यास ती सक्षम आहे. रणबीरसोबत रिलेशन असणं हा देखील तिचा वैयक्तिक निर्णय आहे. तो तिचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयी मत तयार करण्याचा किंवा चर्चा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. फक्त ती कायम आनंदी आणि सुखात रहावी हीच आमची इच्छा आहे”, असं पूजाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, “आलिया केवळ उत्तम बहीणच नाही तर एक गुणी अभिनेत्रीही आहे.’गली बॉय’,’ उडता पंजाब’, ‘राजी’ या साऱ्या चित्रपटांमध्ये अभिनयाची बाजी मारत आलियाने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. विशेष म्हणजे तिचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस आणखी चांगला होत आहे”.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये साऱ्यांच्या नजरा आलिया-रणबीरवर होत्या. यावेळी आलियाने जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. सध्या हे दोघंही त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात व्यस्त असून या चित्रपटाची धुरा अयान मुखर्जी यांनी स्वीकारली आहे.