प्रत्येक माणूस त्याला त्याच्या आयुष्यात काही तरी महत्त्वाची गोष्ट मिळवण्यासाठी कायमच जमवा जमवी करत असतो. सहाजिकच ही जमवा जमवी अनेकदा आर्थिक असते. एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा एखादं स्वप्न साकारण्यासाठी अनेकदा पैशांची जमवा जमव करणं हे गरेजचं असतं. सामान्य माणसाला अशी जमवा जमव अनेकदा करावी लागते. सामान्य माणसांप्रमाणेच कलाकार मंडळीही त्यांच्या आयुष्यात अशी जमवा जमव करत असतात. अशीच काहीशी जमवा जमव एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केली होती आणि ही अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत (Pooja Sawant).

मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने व सौंदर्याने मोहिनी घालणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. हिंदी सिनेसृष्टीत पोहोचलेल्या पूजाचा ‘क्षणभर विश्रांती’ हा पहिला मराठी चित्रपट होता. या चित्रपटामुळे पूजा मराठी प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली. या पहिला चित्रपटाच्यावेळी पूजाकडे स्वतःची कार नव्हती. पण त्यानंतर तिने मेहनत करत स्वतःची कार खरेदी केली आणि तिच्या या पहिल्या कारचा एक खास किस्साही आहे. याबद्दल स्वतः पूजाने सांगितलं आहे.

‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूजाने तिच्या पहिल्या गाडीचा किस्सा सांगितलं आहे. यावेळी पूजाने असं म्हटलं की, “माझा पहिला चित्रपट क्षणभर विश्रांती होता. तर त्या चित्रपटाच्या म्युजिक लाँचसाठी मला माझ्या बाबांनी बाईकने (दुचाकी) सोडलं होतं. साहजिकच तो माझा पहिला चित्रपट होता; तेव्हा आमच्याकडे चारचाकी गाडी नव्हती. बाकी सगळ्यांकडे होती. त्यामुळे माझ्या बाबांना तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. त्यानंतर त्यांनी मला एक वापरलेली गाडी गिफ्ट केली होती.”

पूजा सावंत (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
पूजा सावंत (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

यापुढे पूजाने सांगितलं की, “मग काही दिवसांनी आम्हा सगळ्यांना असं वाटलं की, आता गाडी घेण्याची योग्य वेळ आली आहे. तेव्हा मी, माझी बहीण, आई आणि वडील आम्ही सर्वांनी पैशांची जमवा जमव केली होती. अगदी थोडे थोडे पैसे जमवून एक छान रक्कम झाली होती. त्यानंतर माझी पहिली नवीन गाडी माझ्या घरी आली होती. त्यामुळे आम्ही पैशांची केलेली ही जमवा जमव आमच्यासाठी खूपच खास आहे आणि अशी माझी लक्ष्मी माझ्या घरी आली.”

पूजा सावंत (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
पूजा सावंत (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

दरम्यान, पूजाने ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या पहिल्या गाडीचा खास किस्सा आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओसह तिने अशोक सराफ व वंदना गुप्ते यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटाला आणि चित्रपटातील कलाकारांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. येत्या १० एप्रिल रोजी येणाऱ्या या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी आहे.

‘अशी ही जमवा जमवी’ची कथा थोडी खट्याळ, थोडी गोंडस आणि थोडी हळवी असल्याचे ट्रेलरमधून पाहायला मिळाले. तसेच आजच्या तरुणाईबरोबरच प्रौढांनाही भावणारा आणि नवीन विचार मांडणारा हा चित्रपट आया चित्रपटात चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे व ओमकार कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.