अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला एक फोटो. या फोटोमध्ये ती बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबत पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर दागिन्यांच्या जाहिरातीसाठी कतरिना व पूजाने हा फोटोशूट केला होता. त्याचाच सुंदर फोटो पूजाने सोशल मीडियावर पोस्ट केला. पूजाने हा फोटो पोस्ट करताचक्षणी त्यावर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडू लागला. विशेष म्हणजे बऱ्याच मराठी कलाकारांनी पूजाचं कौतुक केलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडची वाट धरली आहे. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर या अभिनेत्रींनी मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखविली आहे. याच अभिनेत्रींच्या पावलावर पाऊल ठेवत पूजानेही बॉलिवूडवारी केली. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विद्युत जामवालसोबत ‘जंगली’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आता कतरिनासोबत जाहिरातीत झळकल्याने सर्वजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

पाहा फोटो: मितालीच्या आयुष्यातील ‘जिवलगा’

पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिने केलेल्या उत्कृष्ट अभिनयानंतर तिच्या वाट्याला अनेक दर्जेदार भूमिका आल्या.’आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader