वादग्रस्त कारणांनी नेहमी चर्चेत असणारी मॉडेल पूनम पांडेला शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. मीरा रोड परिसरातील शिवार गार्डन येथे शुक्रवारी मध्यरात्री अश्लिल हावभाव व इशारे केल्याप्रकरणी अभिनेत्री पूनम पांडे हिची मीरारोड पोलिसांनी अटक केल्यानंतर समज देऊन सुटका केली. यावेळी पूनम अतिशय तंग व तोकड्या कपड्यात होती आणि या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या दिशेने अश्लील हावभाव करत होती. हा प्रकार पाहणा-या नागरिकांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी तिला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेले व तिला समज देऊन सोडून दिले. मीरारोड पोलिसांनी मुंबई पोलीस अॅक्ट ११०,११७ प्रमाणे ही कारवाई केली. पूनम पांडेने या कृत्याप्रकरणी काय सांगितले, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. पण, एका वजनदार नेत्याच्या दूरध्वनीनंतर पोलिसांनी तिला सोडून दिल्याची चर्चा सुरू आहे.  मात्र आपल्यावर केलेले आरोप साफ खोटे असून त्यावेळी मी कारमध्ये बसून फक्त गाणी ऐकत असल्याचे पूनम पांडेने ट्विटरवर सांगितले.

Story img Loader