पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे. विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आता विवेकच्या निवडीवरून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदींची आणि विवेकची फिरकी घेतली आहे.

‘डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका करण्यासाठी अनुपम खेर सारख्या उत्तम अभिनेत्याची निवड होते, पण बिच्चाऱ्या मोदींना मात्र आपल्या जीवनपटासाठी विवेक ओबेरॉय सारख्या अभिनेत्यावर समाधान मानावं लागत आहे त्यापेक्षा सलमानची निवड झाली असती तर खरी मज्जा आली असती’ असं उपहासात्मक ट्विट करत ओमर यांनी मोदींची फिरकी घेतली आहे.

मोदींच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट या वर्षांत प्रदर्शित होणार आहे. जवळपास २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला लूक प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी विवेकला ट्रोल केलं. यात ओमरही मागे राहिले नाही. या पोस्टर लाँचनंतर त्यांनी मोदींची आपल्या उपहासात्मक ट्विटनं फिरकी घेतली. त्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader