आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सोशल मीडियावर असे फोटो प्रचंड व्हायरल होतात. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.
फोटोमधील या चिमुकलीने पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा फ्रॉक परिधान करून कारंज्याच्या शेजारी उभी राहत फोटो काढला आहे. ही चिमुकली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक आहे. मानसीने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जुना फोटो शेअर केला होता. यानंतर अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा देत स्वत:च्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हेही वाचा : “आयुष्यातील सर्वात वाईट दिवस…” शाहिद कपूर म्हणाला, ऐश्वर्या रायबरोबर ‘ताल’ चित्रपटाचे शूट करताना…
बालपणीच्या फोटोला कॅप्शन देत मानसी लिहिते, “रोने की वजह भी न थी, न हंसने का बहाना था, क्यो हो गए हम इतने बडे, इससे अच्छा तो वो बचपन का जमाना था” मानसीचा बालपणीचा फोटो पाहिल्यावर तिचे चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. यावर “एका युजरने लहानपणापासून तू गोड दिसतेस”, तर दुसऱ्या एका युजरने “तुझे सगळे फोटो छान असतात…” अशा कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचे लग्न १९ जानेवारी २०२१ मध्ये झाले होते. त्याआधी दोघेही काही काळ रिलेशनशिपमध्ये होते, परंतु लग्नाच्या एक वर्षानंतर मानसी आणि प्रदीपच्या नात्यात दुरावा आला. काही दिवसांपूर्वी मानसीने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचे जाहिर केले.