क्षितिज पटवर्धन लिखित, दिग्दर्शित ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या पहिल्या एआय महाबालनाट्याला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात अभिजीत केळकर / पुष्कर श्रोत्री, अभिनय बेर्डे, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले आणि निर्मिती सावंत पाहायला मिळत आहेत. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने नुकताच १०० प्रयोगांचा टप्पा पार केला. २० एप्रिलला या नाटकाचा १००वा प्रयोग झाला. या प्रयोगाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी खास उपस्थिती लावली होती. याचनिमित्तानं क्षितिज पटवर्धननं नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाच्या १००व्या प्रयोगाच्या खास क्षणाचे फोटो शेअर करत क्षितिज पटवर्धननं लिहिलं आहे, “काल सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी १००व्या प्रयोगाला येऊन आमचा फक्त उत्साहच वाढवला नाही तर मराठी पुढच्या पिढीत रुजवण्यासाठी आणि मुलामधलं स्क्रीन अॅडिक्शन कमी करण्यासाठी नाटकाला सहकार्य करण्याची खात्री सुद्धा दिली. त्यांचे खरोखर मनःपूर्वक आभार. कालचा प्रतिसाद अक्षरशः अविस्मरणीय होता.”
पुढे क्षितिज पटवर्धननं लिहिलं की, मराठी आतून बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही गेले वर्षभर करत आहोत. नव्या पिढीत आजवर जवळपास २५००० मुलांना मराठी भाषेची गंमत, बोलीभाषांचं महत्व, मराठी संस्कृती, साहित्य परंपरा या सगळ्याबद्दल भव्य दिव्य पद्धतीनं मांडलं आहे, पुढेही मांडू. बाहेरच्यांशी मराठीवरुन भांडण्यापेक्षा आपल्या आत मराठी रुजवणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं. त्यासाठी मराठी कला, साहित्य, सिनेमा, नाटक यांचा चांगला अनुभव देणं ही बनवणाऱ्यांची आणि घेणं हे रसिकांची जबाबदारी आहे. त्यानेच व्यवसाय, संस्कृती आणि पर्यायानं भाषा सुद्धा जिवंत राहील. मराठीचा मक्ता घेण्यापेक्षा मराठीची पताका घेणं गरजेचं आहे जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत देता येईल.
“काल जितेंद्र जोशी या जिवलग मित्राच्या सांगण्यावरून ‘आज्जीबाई जोरात! म… मराठीचा!’ अशी टॅगलाईन करतो आहोत. तुम्हाला कशी वाटतेय नक्की सांगा,” असं क्षितिज पटवर्धननं प्रेक्षकांना विचारलं आहे. क्षितिजची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.